शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल: ‘हे’ मार्ग राहणार बंद

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या परंपरागत दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी या संदर्भात अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यानुसार, दादर भागातील काही रस्ते बंद राहणार आहेत तर काही ठिकाणी पार्किंगवर बंदी घालण्यात आली आहे.
शिवसेनेच्या परंपरागत दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येत असतात. त्यामुळं प्रचंड गर्दी उसळते. अशा वेळी गैरसोय होऊ नये म्हणून दरवर्षी पोलिसांकडून वाहतुकीत बदल केला जातो. त्याचप्रमाणे यंदा काही निर्बंध घालण्यात आले आहेत. हे निर्बंध १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. वाहतुकीतील बदलाचा तपशील पुढीलप्रमाणे…
‘हे’ रस्ते राहणार बंद
सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून एसव्हीएस रोडवरील माहीममधील कापड बाजार जंक्शनपर्यंतचा रस्ता बंद राहील. प्रवासी सिद्धिविनायक जंक्शन, एस. के. बोले रोड, आगर बाजार, गोखले रोड आणि पोर्तुगीज चर्च गेट मार्गाचा वापर करू शकतात.