वाहतुकीची कोंडी
बेशिस्त वाहनचालकांमुळे होतेय, वाहतुकीचे उल्लंघन
पुणे : शहरातील वाहतूककोंडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रस्त्याच्या चुकीच्या बाजूने आणि एकेरी वाहनचालवणे, नो-एंट्री झोनमध्ये दुचाकी चालवणारे दुचाकीस्वार अशा वाहनचालकांची संख्या वाढत आहे. वाहतूक पोलिसांच्या नोंदींमधून ही बाब समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने हेल्मेट न वापरणारे आणि शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये सिग्नल तोडणारे दुचाकीस्वारही आहेत. वाहतूक शाखेच्या अधिकार्यांनी नोंदवलेल्या एकूण ९.९६ लाख कारवायांपैकी तब्बल २० टक्के वाहतुकीचे उल्लंघन हे बेशिस्त वाहनचालकांमुळेच होत असल्याचे दिसून आले आहे.
सध्याच्या घडीला एकूण ४९ हजार ५८६ प्रकरणे अंतिम कारवाईसाठी न्यायालयात पाठवण्यात आली आहेत. उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना किमान १५ दिवसांत दंड भरणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास, त्यांच्या केस पुढील कारवाईसाठी न्यायालयात पाठविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे. कोणत्याही परिस्थितीत वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम मोडू नये अन्यथा आता पुढील कारवाई अटक आहे. प्रत्येक वाहन चालकांनी काळजी घ्यावी.
राहुल श्रीरामे पोलीस उपायुक्त (वाहतूक विभाग)
पुणे वाहतूक शाखेने दिलेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते ७ ऑगस्ट दरम्यान तब्बल ९.९६ लाख वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आले आहे. तर वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून एकूण ४०.३१ कोटी रुपयांची वाहतूक थकबाकी अद्यापही कायम आहे. तब्बल ७.२३ लाख वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनी दंड भरला नाही. मात्र, गेल्या वर्षी याच कालावधीत वाहतूक पोलिसांनी सात लाख व्यक्तींना दंड केला. त्यांपैकी पाच लाख जणांनी दंड भरला नाही, तर एकूण ३० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या सात महिन्यांतील सुमारे पाच लाखांचा दंड येत्या महिनाभरात न भरल्यास अशा वाहनचालकांविरुद्ध थेट न्यायालयात कारवाई केली जाईल, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहेत.
ई-चलन मिळाल्यावर त्याकडे दुर्लक्ष करणे हे दंड वसूल न होण्याचे एक प्रमुख कारण आहे. अनेक नागरिक ई-चलन संदेशांकडे दुर्लक्ष करतात आणि दंड भरणे देखील टाळतात ज्यामुळे दंडाची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच, अनेक वाहने मोबाइल क्रमांकाशी ऑनलाइन जोडलेली आहेत, जी सध्या वापरात असलेल्या मोबाइल क्रमांकांपेक्षा वेगळी असू शकतात. वाहतूक पोलिसांनाही काही लोक बनावट नंबरप्लेट लावून वाहने चालवत असल्याचे आढळून आले आहे. जेव्हा ही वाहने नियमांचे उल्लंघन करतात, तेव्हा मूळ मालकांच्या मोबाइल क्रमांकावर ई-चलन पाठवले जाते आणि दंड मात्र पेंडिंगच राहत असल्याचे दिसून आले आहे.
शहरातील रविवार पेठ भागातील गुरुनानक मंदिर रोडवर कायम विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांची संख्या अधिक आहे. रविवार पेठ पोलीस चौकीजवळील मस्जिदच्या उजव्या रोडवरून मोठ्या प्रमाणात विरुद्ध दिशेने वाहनचालक मुख्य लक्ष्मी रोडवर एंट्री करीत असतात. त्यामुळे लक्ष्मी रोडवरून जाणाऱ्या वाहनचालकांना थेट वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी काही अपघात सुद्धा झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने दुचाकीस्वारांचे प्रमाण जास्त आहे. या ठिकाणी दुचाकी वाहनाबरोबरच रिक्षा व टेम्पो आदी वाहने सर्रास जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने अशा बेशिस्त वाहनचालकांची चांगलीच फावत आहे.
शहरातील शनिवारवाड्याजवळील बाजीराव रोड येथील लालमहाल भागात सुद्धा आता विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांची सध्या एंट्री होत आहे. त्याच बरोबर सदाशिव पेठ, टिळक रोड, सेव्हन लव्हज् चौक, मार्केटयार्ड रोड, हिराबाग चौक, दत्तवाडी दांडेकर मुख्य चौक, तिरंगा चौक, येरवडा येथील काही भाग, पर्णकुटी रोड चौक, भवानी पेठ येथील एडीकॅम चौक, अजमेरा कॅम्पलेक्स रोड, जिजामाता चौक, धनकवडी बसस्थानक रोड अशा बहुतांश भागातील रोडवरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांची संख्या अधिक आहे. यातील अनेक ठिकाणी पाठीमागून गाड्यांना धडक देणे, समोरासमोर एकमेकांच्या वाहनांना धडक मारणे, गाड्या पलटी होणे, वाहन स्लिप होणे या सोबतच किरकोळ, माध्यम आणि गंभीर स्वरूपाचे अपघातसुद्धा झाले आहेत.