सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या खिशाला बसणार झळ; ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकीट दरात केली दुप्पट वाढ

पुणे | Travels Tickets – सध्या सर्वांना चाहूल लागली आहे ती गणेशोत्सवाची (Ganeshotsav). गणेशोत्सवात अनेकजण आपल्या गावी जात असतात. तर अनेक लोक गावी जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट (Travels Tickets) बुक करतात. पण आता याच सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे. कारण खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकीट दरात दुप्पट वाढ केली आहे.
परिवहन विभागानं मनमानी पद्धतीनं तिकीट आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या चालकांवर कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र, तरीही ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून तिकीटाच्या दरात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. रेल्वे, एसटी बसेसच्या सर्व जागा आरक्षित झाल्यानं गावी जाण्यासाठी लोकांना खासगी बसचा पर्याय असल्यानं ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकीटाच्या दरात वाढ केली आहे.
राज्य परिवहन महामंडळानं प्रवासी संवर्गातील बसच्या टप्पा वाहतुकीचं भाडे निश्चित केले आहे, त्यानुसार ट्रॅव्हल्सचे तिकीट ठरविण्यात आले आहे. ट्रॅव्हल्सला एसटीच्या तिकीटापेक्षा 50 टक्क्यांपर्यंत अधिक रक्कम आकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. तरीही काही ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकीटाच्या दरात 50 टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे.
ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकीटाच्या दरात 50 टक्क्यांहून अधिक वाढ केली असल्यास या ठिकाणी करा तक्रार
ट्रॅव्हल्सवाल्यांनी प्रवासादरम्यान जादी तिकिटाची रक्कम घेतल्याचं आढळल्यास प्रवाशांनी आरटीओकडे rto.12-mh@gov.in या ई-मेल आयडीवर किंवा कार्यलयीन वेळेत आरटीओ कार्यालयाकडे 20-26058080, 020-26058090 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी.