राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांची लवकरच निघणार श्वेतपत्रिका, उद्योगमंत्र्यांची घोषणा!

मुंबई : (Uday Samant On Aaditya Thackeray) शिंदे-फडणवीस यांच्या चार महिन्याच्या कार्यकाळात वेदांता- फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क, मेडिसीन डिव्हाईस पार्क, टाटा एअरबस पाठोपाठ आता विमान तसेच क्षेपणास्त्रांचे इंजिन बनवणारी फ्रेंन्च मल्टिनॅशनल कंपनी सॅफ्रन ग्रुप महाराष्ट्राबाहेर गेली आहे. यामुळे जवळपास 2 लाख कोटींची गुंतवणूक आणि 3 लाख रोजगार राज्यातून बाहेर गेले आहेत.
दरम्यान त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हे प्रकल्प राज्याबाहेर जाण्यामागे तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कसं जबाबदार आहे यासंदर्भात थेट पुरावे सादर केले आहेत. तर शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनीही तोडीची पत्रकार परिषद घेऊन भाजप कसे आपल्या अपयशाचं खापर महाविकास आघाडीवर फोडतंय हे स्पष्ट करून दाखवलंय. पाठपुरावा केला नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना ठाकरेंनी थेट पाठपुराव्याची टाईमलाईन सांगूनच प्रत्युत्तर दिलंय.
आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांची खरी वस्तूस्थिती महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी आम्ही येत्या महिन्याभरात श्वेतपत्रिका जाहीर करणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनानं उद्योगांबाबत केलेला पत्रव्यवहार, दाओसमधील बैठका तसेच याचं रेकॉर्डचा पुरावा आम्ही महाराष्ट्राला देणार आहोत, असंही यावेळी सामंत यांनी सांगितलं.