‘सामना’तील टीकेला उदय सामंतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किमान आठ दिवसांतून…”
मुंबई | Uday Samant – आज (12 ऑक्टोबर) ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत दौरे आणि राजकीय मेळाव्यांत व्यस्त असून ‘कॅबिनेट टू कॅबिनेट’च मंत्रालयात हजेरी लावतात, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे. या टीकेला आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे किमान आठ दिवसांतून एकदा मंत्रालयात येतात हे सामनानं मान्य केलं आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त मला बोलयाची आवश्यकता नाही, असा खोचक टोला उदय सामंत यांनी लगावला आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्यावरील टीका वाचताना मला पौराणिक आणि ऐतिहासिक कथा वाचल्यासारखं वाटतं. महाभारत, रामायण, आदिलशाहा, अफजलखान, औरंगजेब, कोथळा काढा असे शब्द प्रयोग ऐतिहासिक आणि पौराणिक नाटकांमध्ये असायचे. ते पुन्हा एकदा महाराष्ट्राला बघायला मिळत आहेत, असंही सामंत म्हणाले.
दरम्यान, सततचे दौरे आणि राजकीय मेळाव्यांत व्यस्त असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ‘कॅबिनेट टू कॅबिनेट’च मंत्रालयात हजेरी लावतात. बुधवारी मंत्रीमंडळ बैठक आटोपल्यावर थेट पुढच्या बुधवारी मंत्रालयात येतात. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यांमुळे प्रशासकीय कामे मोठ्या प्रमाणावर रखडून पडत असल्याचं प्रशासकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली होती.