‘या’ कारणामुळे उदयनराजे प्रतापगडावरील शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत
मुंबई | Udayanraje Bhosale – शिवप्रताप दिनानिमित्त साताऱ्यातील किल्ले प्रतापगडावरील (Pratapgad Fort) कार्यक्रमांना खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) उपस्थित राहणार नाहीयेत. तर उदयनराजेंच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले या देखील प्रतापगडावरील कार्यक्रमांना उपस्थित राहणार नाहीत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे उदयनराजे नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी प्रतापगडावरील कार्यक्रमांना न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
आज (30 नोव्हेंबर) शिवप्रताप दिनाच्या निमित्तानं किल्ले प्रतापगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या उपस्थित अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी प्रतापगडावरील भवानी मातेची पूजाही करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालणार आहेत. तसंच या कार्यक्रमांना उदयनराजेंनी उपस्थित राहावं यासाठी काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न सुरु होते. मात्र, उदयनराजेंनी त्याला प्रतिसाद दिला नाही अशी माहिती आहे.
दरम्यान, आज सकाळी उदयनराजे यांनी साताऱ्यातील लेक व्ह्यू या हॉटेलमध्ये 3 डिसेंबर रोजी किल्ले रायगडावर होणाऱ्या मेळाव्याच्या तयारीसाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत 3 डिसेंबरच्या रायगडावरील निर्धार शिवसन्मानाचा या मेळाव्याच्या नियोजनाबाबत कार्यकर्त्यांबरोबर चर्चा होणार आहे. त्यामुळे उदयनराजे प्रतापगडावरील आजच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे.