“यापुढे कुणी शिवरायांचा अवमान करून दाखवाच मग…”, उदयनराजे संतापले; केली ‘ही’ मोठी घोषणा
महाड | Udayanraje Bhosale – गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते वादग्रस्त विधान करत असल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असणारे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज (3 डिसेंबर) रायगडावरून बोलताना भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. तसंच यावेळी त्यांनी मोठी घोषणा देखील केली आहे.
उदयनराजे म्हणाले, “काय वेळ आली आहे? महाराजांचा जयघोष करण्यासाठी आलो असतो तर वेगळा आनंद झाला असता. पण, आपण काय करतोय? शिवसन्मानाचा निर्धार करण्याची वेळ आलीये आपल्यावर. या लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत की वैयक्तिक स्वार्थासाठी लोकांच्या विचारात तुम्ही बदल केला. शिवाजी महाराजांचा आपण सन्मान करायला हवा हे बोलावं लागतं. ही बोलायची गरज आहे? ते अंतकरणातून आलं पाहिजे”, अशा शब्दांत उदयनराजेंनी आपली व्यथा मांडली.
“आपण सगळ्यांनी लवकरच एक तारीख ठरवून मुंबईतल्या आझाद मैदानात जायचं आहे. आजचा दिवस इतिहासात लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. कारण आज आपण आपल्या सगळ्यांची अस्मिता असणाऱ्या शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्यासाठी एक निर्धार केला आहे. आज आपण सगळे इतिहासाचा भाग झालो आहोत. कुठल्याही प्रकारे यामध्ये राजकारण येऊ देऊ नका. यामागे कुणाचाही स्वार्थ नाही. यापुढे शिवाजी महाराजांचा अवमान कुणी करूनच दाखवावा. काय होईल ते आपल्या परीनं आपण बघूनच घेऊ”, अशी घोषणा उदयनराजेंनी यावेळी केली.