राऊतांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरेंनी ‘दैनिक सामना’ संदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
मुंबई | Uddhav Thackeray Becomes Saamana Editor – शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’ मोठे बदल करण्यात आले आहेत. शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या या वृत्तपत्राची धुरा पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या हाती घेतली आहे. मागील आठवड्यामध्ये संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर आता सामनाची जबाबदारी उद्धव यांनी स्वत:कडे घेतली आहे. तसंच वृत्तपत्राच्या प्रिंट लाइनमध्ये आज उद्धव ठाकरेंचं नाव संपादक म्हणून छापण्यात आलं आहे.
महाराष्ट्रामध्ये 2019 साली झालेल्या सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी या वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजीनामा दिला होता. मार्च 2020 मध्ये उद्धव यांनी हे पद त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवलं होतं. मात्र आता सत्तेतून पायउतार झाल्यानंतर महिन्याभरानंतर उद्धव यांनी पुन्हा एकदा ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. तसंच वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत असतील.
उद्धव ठाकरे यांनी सामनाचा कारभार हाती घेतल्यानंतर आता ते वृत्तपत्राच्या माध्यमातून शिंदे सरकारला लक्ष्य करणार का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. संजय राऊत यांना अटक करण्यात आल्यानंतर वृत्तपत्रातील अग्रलेख आणि रोखठोक सारख्या सदरांसंदर्भात चर्चांना सुरुवात झाली होती. तसंच संजय राऊत यांनी न्यायालयाकडे अग्रलेख लिहिण्यासंदर्भात परवानगीही मागितली होती. मात्र ती परवानगी नाकारण्यात आली.