कोलंबोत पावसाची विश्रांती! थोड्याच वेळात भारत-पाकिस्तान थरारक सामना रंगणार?

कोलंबो : (Asia Cup 2023 IND vs PAK) जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी आनंदवार्ता समोर आली आहे. कोलंबोमध्ये पाऊसाने उसंत घेतली, असून थोड्याच वेळात भारत-पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना पुन्हा एकदा रंगणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी आजचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा महामुकाबला पाहाण्यासाठी क्रिकेटप्रेमींच्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रविवारी पावसामुळे सामना थांबवावा लागला होता. काल, जिथे सामना थांबला तेथूनच आज पुन्हा सुरु होणार आहे.
काल सामना थांबला तेव्हा भारताने दोन बाद 147 धावा केल्या होत्या. विराट कोहली आणि केएल राहुल मैदानावर होते. आज विराट कोहली आणि राहुल डावाची सुरुवात करतील. विराट कोहलीकडून आज मोठ्या खेळीची आपेक्षा सर्वांनाच आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी बाबरचा निर्णय चुकीचा ठरवला. दोघांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजीचा समाचार घेतला.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 100 चेंडूत 121 धावांची दमदार सलामी दिली. रोहित शर्माने 49 चेंडूत 56 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये चार षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. तर गिल याने 52 चेंडूत 58 धावांचे योगदान दिले.