“माझ्या पक्षाचं नाव, चिन्ह गोठवलंत तरीही…”, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

मुंबई | Uddhav Thackeray On BJP – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत चांगलीच फुट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. तसंच शिंदे गटानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरही दावा केला. मात्र, निवडणूक आयोगानं या दोन्ही गोष्टी गोठवल्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं आहे. त्याचबरोबर अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं भाजपवर देखील निशाणा साधला आहे. बुलढाण्यातील शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी ‘मातोश्री’वर बोलताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अंधेरी निवडणुकीवरून भाजपावर टीकास्र सोडलं..
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “धनुष्यबाण गोठवलं तरी हातातली मशाल घेऊन तुम्ही पुढे जात आहात. प्रत्येक चिन्हाचं एक महत्त्व असतं. रामाने धनुष्यबाणानेच रावणाला मारलं होतं. तर अन्याय जाळणारी आणि अंधारात वाट दाखवणारी मशाल असते. निवडणूक आयोगानं काही काळापुरता हा आदेश दिला आहे. नंतर आपलं नाव आणि चिन्ह वगैरे परत मिळणारच आहे.”
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजप, शिंदे गट आणि इतरांना विनंती करावी, असं मत व्यक्त केलं जात होतं. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “अंधेरीची पोटनिवडणूक होणार आहे. त्याबद्दलही काही जणांना वाटतं की मी विनंती केली नाही. पण मी का विनंती करू?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पुढे उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. “माझ्या पक्षाचं नाव गोठवलंत, माझं चिन्ह गोठवलंत. एवढं करूनही उमेदवार देऊन नंतर पळ काढलात. मग एवढं सगळं कशाला केलं? फक्त आपल्याला मनस्ताप द्यायचा, आपल्याला छळायचं आणि शिवसेना संपवायची यासाठी हे सगळं केलं गेलं”, असा आरोप ठाकरेंनी भाजपवर केला.