उद्धव ठाकरेंचे भाजप ‘ठाकरी’ भाषेत उत्तर, म्हणाले; “स्वातंत्र्यलढ्यात सहभागी नसलेल्या संघाच्या पिल्लांनी…”

मुंबई : (Uddhav Thackeray On Devendra Fadnavis) राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील टीकेवरुन शिवसेनेला कोंडीत पकडू पहाणाऱ्या भाजपला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरी भाषेत सुनावलं आहे. आम्हाला सावरकरांबद्दल अतीव प्रेम, नितांत आदर आणि श्रद्धा आहेच. कुणी कितीही पुसू म्हटली तरी ती पुसणार नाही. पण स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रश्न कुणी विचारावा? ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी सुतराम संबंध नाही. अशा मातृसंस्थेच्या मुलांनी किंवा पिल्लांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रेम व्यक्त करणं हे हास्यास्पद आहे.
जे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून दोन हात लांब होते, त्यांनी वीर सावकरांबद्दल बोलू नये. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. दुसरी गोष्ट ज्या स्वातंत्र्यवीरांनी ज्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला, तेच स्वातंत्र्य आज धोक्यात आलंय. ते स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत. त्यामुळे भाजपने बाष्कळपणा बंद करावं. पहिल्यांदा तुमचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान सांगा आणि नंतर आम्हाला प्रश्न विचारा, असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी दिलं.
शिवसेनाप्रमुख म्हटलं तर संघर्ष आला. अन्यायाविरुद्धचा लढा आलाच. एका अर्थाने आजचा हा स्मृतिदिन काहीसा वेगळा आहे. कारण काही जणांना शिवसेनाप्रमुख कोण होते समजायला दहा वर्ष लागली. त्यांना आता शिवसेनाप्रमुखांबद्दलचा पुळका आला आहे. त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करायला काही हरकत नाही. मात्र ते करताना त्याचा कुठेही बाजार होऊ नये अशी माझी नम्र भावना आहे. विचार व्यक्त करण्यासाठी कृती असावी लागते. कृतीतून विचार व्यक्त करता येतो. कृती नसेल तर विचार हा विचार राहत नाही, तर केवळ बाजारुपणा वाटतो. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार मांडू नये एवढीच अपेक्षा व्यक्त करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.