ताज्या बातम्यारणधुमाळी

“भाजपवाल्यांनो सावधान! उद्या एकनाथ शिंदे स्वत:ला नरेंद्र मोदी समजून…”, उद्धव ठाकरेंचा टोला

मुंबई | Uddhav Thackeray On CM Eknath Shinde – माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा पहिला भाग काल म्हणजेच 26 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला. तर आज (27 जुलै) या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसंच उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ‘प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. भाजपवाल्यांनो, सावधान, उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली आहे. 

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री झाले तर प्रॅाब्लेम काय तुम्हाला? म्हणून काय तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवलं? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी नको. ठीक आहे, पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटकं पाहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता. मी तेव्हा म्हणालो होतो, संयम ठेवा. आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असं सांगणारे हेच लोक होते. गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता.

2019 साली भाजपनं खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला आहे. तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमकं तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणे शोधताय. त्यांची लालसा! स्वतःला मुख्यमंत्री पद त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवले. आता तर शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करायला लागले की, ‘ही आमची शिवसेना’ म्हणून. अत्यंत घाणेरडा, दळभद्री प्रकार. हे बघितल्यानंतर मला नाही वाटत, भाजप त्यांना कधी पुढे करील. नाही तर नंतर ते नरेंद्र भाईंशी तुलना करतील स्वतःची आणि पंतप्रधान पद मागतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे. मला एका गोष्टीचं समाधान आहे. मी पण अडीच वर्षं मुख्यमंत्री होतो, पण मला सत्तेची चटक लागली नाही. तो सत्तापिपासूपणा रक्तात भिनला की तुम्ही कोणाचे नसता आणि कुणी तुमचं नसतं तेच त्यांचं आज झालं आहे, असंही उद्धव ठाकरे त्यांनी म्हटलं आहे.  

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये