‘धनुष्यबाण’ कोणाचा? ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे दोन ट्रक भरुन शपथपत्र

नवी दिल्ली : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षातील वाद सवोच्च न्यायालयाकडे प्रलंबित आहे. मात्र, मागील सुनावणीत निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात कागदपत्रांची लढाई सुरु झालेली आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे दोन ट्रक भरुन शपथपत्र दाखल केले.
मात्र, ‘खरी शिवसेना कोणाची?’ हा वाद कायम आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला ”शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” हे नाव मिळालं. तर चिन्ह ‘मशाल’ मिळालं. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं असून ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह मिळालं आहे.
आता दोन्ही बाजूने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रांची लढाई सुरु आहे. शिंदे गटानेदेखील अडीच लाख शपथपत्र दाखल केलेले असून साडेसात लाख शपथपत्र दाखल करणार असल्याचं सांगितलं. आज उद्धव ठाकरे गटाने तब्बल साडेआठ लाख शपथपत्र असल्याचं सांगितलं आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आपल्या बाजूने किती पदाधिकारी आहेत, याची माहिती देण्यात आली आहे.
त्यामुळे एवढी कागदपत्रं तपासून निर्णय द्यायला निवडणूक आयोगाला किती वेळ हा देखील एक प्रश्न आहे. त्यामुळे शिंदे गटाचे प्रदोत भरत गोगावले यांच्या वक्तव्यांचा पुन्हा एकदा येथे उल्लेख करावा लागेल. ते म्हणाले होते शिवसेना कोणाची हा वाद 2-3 वर्षे मिटणार नाही.