ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“धनुष्यबाण चोरणाऱ्यांना सांगतोय, हिंमत असेल तर…” मातोश्रीबाहेरून उद्धव ठाकरेंचं खुलं आव्हान

मुंबई : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला दिलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा निर्णय झाला. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातो आहे. अशात सर्वोच्च न्यायालयात आम्ही धाव घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच पक्षाचं नाव गेलं आणि चिन्ह गेलं म्हणजे शिवसेना संपली असं कुणीही समजू नये. ज्यांनी आधी माझे वडील चोरले अशा चोरांना महाशक्ती प्रतिष्ठा देऊ पाहते आहे मात्र चोर तो चोरच असतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. त्यानंतर आज मातोश्रीबाहेर उभं राहूनही त्यांनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आहे.

“आज महाशिवरात्र आहे, मात्र आपलं शिवधनुष्य चोरीला गेलं आहे. या चोरांना आम्ही धडा शिकवणार आहोत. आपण सगळ्यांनी या चोरांना धडा शिकवू. मी या चोरांना आव्हान देतो आहे की, तुम्ही जो धनुष्यबाण चोरला आहे तोच धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरे या, मग बघू जनता कुणाला निवडणार?” असं खुलं आव्हानच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गटाला दिलं आहे.

शिवसेनेत जून २०२२ मध्ये सर्वात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसह आधी सुरतला आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले. २१ जून ते २९ जून हे नाट्य सुरू होतं. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला. सरकार अल्पमतात आलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री असेलेले उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ३० जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

राज्यात झालेल्या या महत्त्वाच्या घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना या पक्षावर आणि धनुष्यबाण या चिन्हावरही दावा सांगितला होता. त्यानंतर हा वाद सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे गेला. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी आता कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी आणि आपली लढाई नव्याने सुरू करण्यासाठी कंबर कसली आहे. पत्रकार परिषदेतही त्यांचा आक्रमकपणा दिसून आला. तसाच तो आज मातोश्रीच्या बाहेरही दिसला. तिथे जमलेल्या लोकांनीही उद्धव ठाकरेंच्या नावाने घोषणाबाजी करत आम्ही तुमच्यासोबत आहोत असं म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये