“अनेक आव्हानं पायदळी तुडवत शिवसेनेनं भगवा रोवलाय”

मुंबई | Uddhav Thackeray On J P Nadda – “शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यांना कल्पना नाही की शिवसेनेनं अशी अनेक आव्हानं पायदळी तुडवत भगवा रोवलेला आहे”, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ‘मातोश्री’ या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी जळगावातील शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. “राजकारणात हार जीत होत असते पण आता संपवण्याची भाषा केली जात आहे,” असं देखील ठाकरे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याचा आधार आहे. “शिवसेना संपतेय आता केवळ भाजपच राहणार,” असं जेपी नड्डा म्हणाले होते.
महाराष्ट्रात शिवसेना संपतेय, आता केवळ भाजपच राहणार, असं जे पी नड्डा यांनी पाटणा येथील एका कार्यक्रमात म्हटलं होतं. भाजपशी लढण्याची क्षमता कोणत्याही पक्षात नाही, भाजप सोडून अन्य सगळे राजकीय पक्ष संपतील, असंही नड्डा म्हणाले होते.
जे पी नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की,”आजपर्यंत अनेक वेळा शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले. आता शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे मी पहिल्यांदाच बोललो होतो की हा प्रयत्न शिवसेना संपवण्याचा आहे आणि ते परवा भाजप अध्यक्षांनी बोलून दाखवलं. पण त्यांना कल्पना नाही की शिवसेनेनं अशी आव्हानं पायदळी तुडवत भगवा रोवलेला आहे. त्यामुळे राजकारणात हार जीत होत असते. पण कोणी कोणाला संपवण्याची भाषा याआधी आपल्या देशात राजकारण्यांकडून झाली नव्हती.”