Top 5क्राईमताज्या बातम्या

कुचिक बलात्कार प्रकरणाने घेतलं वळण; पीडितेने केले चित्रा वाघांवरच आरोप

राज्य महिला आयोगाने घेतली दखल

पुणे : शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावरील बलात्कार आरोप प्रकरणाने आज नाट्यमय वळण घेतले आहे. या प्रकरणातील पिडीत तरुणीने मोठा गौप्यस्फोट करत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने डांबून ठेवले, तसेच पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला वाघ यांनीच भाग पाडलं, असा गंभीर आरोप तरुणीने केला असून मेसेजचे पुरावे देखील खोटे असल्याचे तरुणीने म्हटले आहे.

चित्रा वाघ यांनी सादर केलेले मेसेजचे पुरावे खोटे असून विशिष्ट यंत्रणा वापरुन माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईलवरुन मला मेसेज येत आहेत, असा दावाही पीडित तरुणीनं केला आहे. याशिवाय काल भाजपच्या पवार नामक एका व्यक्तीनं एक पत्र मला आणून दिलं, हे पत्र पोलिसांना देण्यासाठी मला जबरदस्ती करण्यात येत आहे, असा आरोपही या तरूणीनं केला आहे. हे पत्र कुचिक यांनी दिल्याचं भासवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जातोय, असा आरोपही या पीडित तरूणीने केला आहे.

आरोपांनंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
याप्रकरणी कोणत्याही चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे. मी जर तिच्यावर दबाब आणण्यास भाग पाडलं असेल तर यावर मी आणखी काय बोलू? ती हे का बोलते आहे? हेच मला कळत नाहीए. विद्या चव्हाण या डोक्यावर पडलेल्या आहेत, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मी बलात्काऱ्यांना पाठीशी घालते, असे आरोप माझ्यावर झाले होते, मग त्यावेळी कोण पुढं का आलं नाही? या प्रकरणी मी कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे. कसल्या प्रकारचे गंभीर आरोप माझ्यावर झालेत मला तर काहीच समजत नाहीए”
“पीडित मुलीला मी फोन केला होता. आपल्याला लढायचे असेल तर काही गोष्टींची तयारी करावी लागेल. मी तिला मदतच केली आहे. आता हे सगळं कशासाठी होतंय हे काही मला माहिती नाही. ती मुलगी हे सगळं का करते आहे हे ही मला माहिती नाही. त्या मुलीला न्याय मिळावा ही माझी भूमिका होती. बाकी कोणताही हेतू माझा नव्हता. त्यामुळे जे आरोप होते आहेत त्याला मी उत्तर देईल. मी दबाव आणला असेल तर माझी चौकशी करा. माझी तयारी आहे” असंही चित्रा वाघ यांनी आरोपांना उत्तर देताना म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण ?
पुण्यातील शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी 24 वर्षीय तरुणी अचानक गायब झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. संबंधित तरुणी ही दोन दिवसांपासून गायब होती. अखेर दोन दिवसांच्या शोधानंतर ती गोव्यातील एका गावात सापडली आहे. तिला इंजेक्शन देऊन जबरदस्ती पळवून नेण्यात आलं होतं, असा धक्कादायक दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. संबंधित प्रकरणाची आपण पोलिसांना सविस्तर माहिती दिल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे.
त्या म्हणाल्या की, “महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मला सांगायचं आहे की, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शिवसेनेचा बलात्कारी नेता रघुनाथ कुचिकने अत्याचार केलेली मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. पण काल रात्री साडेअकरा वाजता तिचा फोन मला आला होता. मी कुठे आहे ते मला माहिती नाही. पण मला तुमच्या मदतीची गरज आहे. रात्रीची वेळ होती. मी तिला म्हटलं आजूबाजूला घरे असतील. तिथे कुणाचातरी दरवाजा ठोठव आणि त्यांच्याकडे मोबाईल दे. म्हणजे तू कुठे आहे ते ठिकाण मला त्यांच्याकडून कळेल. त्या पद्धतीने तिने केलं. एक गृहस्थ तिथे आले. त्यांनी गोव्यातील मडगावच्या कोलवा गाव असल्य़ाचं सांगितलं. त्यानंतर मी त्यांना गोवा पोलिसांपर्यंत पीडितेला पोहोचवून द्या, अशी विनंती केली. पीडीतेशी बोलल्यानंतर धक्कादायक माहिती मिळाली”, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.

“पीडित मुलगी ही पुण्याला निघाली होती. पण तिला काही लोकांनी अडवलं. यामध्ये पोलीसवालेही होते. तिला इंजेक्शन देण्यात आलं. तिच्याकडून कोणत्यातरी पेपरवर सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर काय झालं ते तिला समजलं नाही. त्यानंतर ती गोव्याच्या एका गावात आढळून आली, अशी माहिती पीडितेने स्वत: दिली”, असा दावा वाघ यांनी केला होता.
“पीडितेचा फोन झाल्यानंतर मी ताबोडतोबड पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलीस आता तातडीने गोव्याच्या दिशेला निघाले आहेत. पीडितेचे आई-वडिलवही तिथे पोहोचत आहेत. जबाबदार लोकांनी बेजबाबदार बोलू नये. तिचे आई-वडील घरी होते. मुलगी बेपत्ताच होती”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने डांबून ठेवले, तसेच पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला वाघ यांनीच भाग पाडलं, असा गंभीर आरोप तरुणीने केला असून मेसेजचे पुरावे देखील खोटे असल्याचे तरुणीने म्हटले आहे.

कुचिक बलात्कार प्रकरण काय?

शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर गेल्या मार्च महिन्यात पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नाचं आमिष दाखवून 24 वर्षीय तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर ती तरुणी गरोदर झाल्यावर तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचाही गंभीर आरोप रघुनाथ कुचिक यांच्यावर करण्यात आला होता.
नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2022 या काळात आपल्यासोबत हा सर्व प्रकार घडला असल्याचं तरुणीने तक्रारीत म्हटलं होत.
आपल्याला लग्नाचं आमिष दाखवत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. तसेच आपण गरोदर असल्याचं कळल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने गर्भपात करुन घेतला असा आरोपीही पीडित तरुणीने केला होता.

गर्भपात केल्याचं तसेच आपल्या संबंधांबाबत कुणालाही सांगितलं तर तुला जीवे मारेल, अशी धमकी देण्यात आल्याचंही पीडित तरुणीने म्हटलं होतं. पीडित तरुणीने या प्रकरणात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.
या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आयपीसी 376, 313, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

काय म्हणाल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर?
महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात जे घडतंय ते अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी असे षडयंत्र रचले जातात. यंत्रणेचा असा गैरवापर करणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. भाजपकडून दररोज सकाळी एक स्क्रीप्ट तयार केली जाते.

त्यानुसार दिवसभर ती स्क्रीप्ट वाचून नाट्य केलं जातं. महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी हे सर्व केलं जातंय. आज मी पीडितेची भेट घेणार आहे. तिने सविस्तर माहिती दिल्यानंतर मी कारवाई करणार आहे, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये