“बाॅम्ब बरेच आहेत, वाती काढल्या आहेत, आता…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला सूचक इशारा
नागपूर | Uddhav Thackeray – नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांबाबत मोठे बाॅम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना यासंदर्भात विचारण्यात आलं. यावर बोलताना ते म्हणाले की, आमच्याकडे बरेच बाॅम्ब आहेत, त्यांच्या वाती काढल्या आहेत, फक्त आता त्या वाती पेटवण्याचा अवकाश आहे, असा सूचक इशारा त्यांनी शिंदे सरकारला (Shinde Government) दिला. ते आज (26 डिसेंबर) नागपूरमध्ये विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “बॉम्ब बरेच आहेत, वाती काढल्या आहेत, आता फक्त त्या वाती पेटवण्याचा अवकाश आहे. मात्र, मला वाटतं आधी ताबोडतोबीनं सीमाभागातील काही लाख मराठी माणसांचं आयुष्य बरबाद होणं थांबवण्यासाठी ठराव केला पाहिजे. त्या भागातील मराठी माणसांनी निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत. आंदोलनंही केली आहेत.”
“काहीजण म्हणतात की, तुम्ही कुठे लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहेत, तुमच्या अंगावर कुठे केस आहेत. या गोष्टीला काहीही अर्थ नाही. असं म्हणणाऱ्यांनी तेव्हा लाठ्याकाठ्या खाल्ल्या होत्या, जेव्हा ते आमच्यात होते. मात्र, त्याचा अर्थ त्यांनी आता गप्प बसावं असा नाही होत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत हा विवादास्पद भाग केंद्रशासित झाला पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.