क्रीडा

रशियन हल्ल्यानंतर युक्रेनचा पहिला विजय

नवी दिल्ली : तब्बल दोन महिन्यांनंतर युक्रेनने जगाला आनंदाची बातमी दिली आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर त्याच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने एक सामना जिंकला आहे. बुधवारी खेळल्या गेलेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात त्यांनी जर्मन क्लब बोरुसिया मोंचेनग्लॅडबॅकचा २-१ असा पराभव केला. हा एक चॅरिटीसाठीचा सामना होता जो रशिया-युक्रेन युद्धातील पीडितांच्या मदतीसाठी खेळला गेला होता. रशियासोबतच्या युद्धानंतर युक्रेनचा हा पहिला विजय आहे. हा सामना बोरोसिया पार्क स्टेडियमवर झाला.

फक्त एक आठवडा प्रशिक्षण :
युक्रेनच्या संघाने फक्त एक आठवडा सराव केला आहे. गेल्या आठवड्यात संघाचे प्रशिक्षक ओलेक्सँडर पेट्राकोव्ह यांनी युक्रेनियन क्लबमधील २३ खेळाडूंना ल्युब्लियानाजवळील स्लोव्हेनिया एफएच्या प्रशिक्षण केंद्रात तयारीसाठी एकत्र केले.

युक्रेनियनसाठी विनामूल्य प्रवेश :
युक्रेनच्या नागरिकांना स्पर्धेत मोफत प्रवेश देण्यात आला. हा सामना पाहण्यासाठी सुमारे २० हजार प्रेक्षक आले होते. यातून जमा होणारी रक्कम युद्धसंघर्षामुळे बाधित झालेल्या लोकांना दिली जाणार आहे.

रशियन हल्ल्याच्या ७७ दिवसांनंतर, हजारो प्रेक्षक युक्रेनियन फुटबॉल संघाला प्रोत्साहन देण्यासाठी युक्रेनियन झेंडे घेऊन स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यांच्यापैकी अनेकांनी युक्रेनियन खेळाडू आणि त्यांच्या देशाच्या समर्थनार्थ संदेशांची पोस्टर्स लावली होती. संघर्षग्रस्तांच्या मदतीसाठी निधी उभारण्यासाठी आयोजित या सामन्याबाबत युक्रेनचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आंद्रे वॅरोनिनने एका जर्मन वाहिनीशी बोलताना सांगितले की, हा सामना आमच्या संघासाठी आणि देशासाठी खूप महत्त्वाचा होता. आम्ही एकटे नसून सारे जग आमच्या पाठी मागे उभी असल्याची आम्हाला जाणीव होत आहे.

युक्रेनच्या विश्वचषकाच्या तयारीनुसार हा सामना महत्त्वाचा मानला जात आहे. १ जून रोजी फिफा विश्वचषक प्ले-ऑफच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात युक्रेनचा सामना स्कॉटलंडशी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ चार दिवसांनंतर कतार येथे होणार्‍या विश्वचषक स्पर्धेसाठी वेल्सशी भिडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये