पुणे शहरातील पुतळ्यांची होणार ‘अल्ट्रासॉनिक टोमोग्राफी टेस्ट’
पुणे शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आलेले पुतळे किती सुरक्षित आहेत, हे कळण्यास आता मदत होणार आहे. काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेनंतर महापालिकेकडूनही शहरातील सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले आहे. त्यात शहरातील सर्व ८० पुतळे सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. तर, यातील २५ पुतळे हे ४० वर्षांपेक्षा अधिक जुने असल्याने त्यांची “अल्ट्रासॉनिक टोमोग्राफी टेस्ट’ (प्रचंड कंपनसंख्या असलेल्या ध्वनीलहरी ) केली जाणार आहे.
महापालिकेच्या भवन विभागाकडून ही माहिती देण्यात आली. तर, काही पुतळ्यांची किरकोळ दुरवस्था झाली असून, ते डागडुजीने दुरूस्त करणे शक्य असल्याचे समोर आले आहे. सिंधुदुर्ग येथील घटनेनंतर पुण्यातील पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास पालिकेच्या भवन रचना विभागाने सुरुवात केली आहे. भवन रचना विभागाने काही पुतळ्यांची पाहणी देखील केली. मात्र अनेक पुतळे ४० ते ५० वर्षे जुने असल्याने ते वरुन सुस्थितीत असले तरी मधून भक्कम आहेत की नाहीत, हे तपासण्यासाठी ही तांत्रिक चाचणी केली जाणार आहे.
महापालिकेच्या हेरिटेज विभागाचे माजी विभागप्रमुख श्याम ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अनेक वर्षे जुन्या पुतळ्यांची सुरक्षितता तपासण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जातो. त्यात अल्ट्रासॉनिक टोमोग्राफी टेस्ट आहे. प्रचंड कंपनसंख्या असलेल्या ध्वनिलहरींच्या माध्यमातून पुतळ्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या घटकाची अखंडता तपासणे समाविष्ट आहे. त्यातून त्यात वापलेले स्टील, स्टीलचे वेल्डिंग, स्टीलला गंज चढला आहे का ? त्याची क्षमता ? या गोष्टींची तपासणी केली जाते.