आरोग्यफुड फंडाबॅक टू नेचर

Back To Nature : काळ्या मिरीचे महत्त्व

मसाल्याच्या पदार्थातली काळी मिरी ही औषधी आहे. लाल मिरचीच्या तुलनेत ती कमी दाहक आणि अधिक गुणकारी आहे. म्हणूनच मसाल्यामध्ये लाल मिरचीऐवजी काळ्या मिरीचा उपयोग केला जातो. काळ्या मिरीचा योग्य पद्धतीने उपयोग केला, तर ती रासायनिक गुणसुद्धा देते. आयुर्वेदात सर्व प्रकारचे जीवाणू, विषाणू इत्यादींचा नाश करणारी औषधी म्हणून काळी मिरी ओळखली जाते. मिरीमुळे खाण्याचा स्वाद वाढतोच, पण त्याचबरोबर तिच्या सेवनाने पोटातील हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड वेगाने वाढते आणि पचन योग्य प्रकारे होते. मिरीमध्ये अनेक प्रकारचे अँटिबॅक्टेरिया असतात. ते आतड्यामध्ये होणारा संसर्ग बरा करतात.

अनेक विकारांवर काळी मिरी गुणकारी ठरते.
सर्दी
: सर्दीमुळे घसा खराब असेल तर काळ्या मिरीचा काढा फायदेशीर ठरतो. सर्दी झाल्यानंतर गरम दुधात काळी मिरीपूड टाकून हे दूध प्यावे. तसेच वारंवार सर्दी होत असेल, शिंका येत असतील तर एका मिरीपासून सुरुवात करून रोज एक मिरी वाढवत न्यायची १५ दिवसांपर्यंत असे करून पुन्हा एक-एक मिरी पुढचे १५ दिवस कमी करत जायचे, अशा प्रकारे मिरी घेतल्यास वारंवार होणारी सर्दी एका महिन्यात समाप्त होते.

घसा बसणे : काळ्या मिरीची पूड, तूप आणि साखर एकत्र करून हे चाटण घेतल्यास बंद गळा मोकळा होतो आणि आवाजदेखील चांगला होतो. ८-१० काळी मिरी पाण्यात उकळून या पाण्याद्वारे गुळण्या कराव्यात. यामुळे गळ्याला झालेला संसर्ग नाहीसा होतो.
त्वचारोग : काळी मिरी तुपात बारीक करून त्याचा लेप करावा. हा लेप त्वचेचा संसर्ग, फोड, मुरुम इत्यादींवर लावावा.
सर्दी, पडसे, खोकला : सर्दी, पडसे, खोकला झाल्यास ८-१० काळे मिरे, १०-१५ तुळशीची पाने एकत्र करून त्याचा चहा प्यावा, आराम मिळतो.
खोकला : काळे मिरे ४-५ आणि सोबत १५ बेदाणे एकत्र खाल्ल्यास खोकला बरा होतो. काळी मिरी दुधात घालून घेतल्यास फायदाच होतो. १०० ग्रॅम गूळ विरघळवून त्यात २० ग्रॅम काळ्या मिरीची पावडर मिसळावी. थोडे थंड झाल्यानंतर त्याच्या छोट्या-छोट्या गोळ्या बनवाव्या. जेवल्यानंतर २-२ गोळ्या खाल्ल्यास खोकल्यासाठी आराम मिळतो. खोकला झाल्यास अर्धा चमचा काळ्या मिरीचे चूर्ण आणि अर्धा चमचा मध एकत्र करून हे चाटण दिवसातून ३-४ वेळा चाटावे. खोकला दूर होतो.
दातदुखी : काळी मिरी दात आणि हिरड्यांच्या वेदना दूर करते. त्यासाठी काळ्या मिरीसोबत मीठ एकत्र करून त्याची पेस्ट बनवावी. ती पेस्ट दातांवर आणि हिरड्यांवर लावावी. वेदना कमी होतात.
वेट लॉस : मिरीमध्ये असे काही घटक आहेत, जे वजन वाढविणार्‍या पेशी कमी करतात.
कोरडा खोकला : कोरडा खोकला असल्यास १०-१५ ग्रॅम शुद्ध तूप घेऊन त्यात ४-५ काळे मिरे टाकावेत आणि ते गरम करावेत. काळी मिरी कडकडून वर येईल. तेव्हा भांडे गॅसवरून खाली उतरवावे. नंतर यामध्ये २० ग्रॅम पिठीसाखर घालावी. काळी मिरी चावून खाऊन टाकावी.

_अनिल काळे, संजीवनी निसर्ग उपचार केंद्र, पंढरपूर

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये