ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचं निधन

पुणे | Prabhakar Bhave Passed Away – ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे (Prabhakar Bhave) यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. तसंच नाट्यसृष्टीत ते भावेकाका म्हणून परिचित होते.
प्रभाकर भावे हे मूळचे साताऱ्याचे होते. त्यांना लहानपणापासून नाटक, संगीत, साहित्याची आवड होती. त्यांनी गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ मराठी नाट्यसृष्टीत रंगभुषाकार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. तसंच मुखवटे तयार करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी लिहिलेल्या रंगभूषा नावाच्या पुस्तकाचं पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं होतं. या पुस्तकाला त्या वर्षीचा राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता.
तरुण कलावंतांमध्ये रंगभूमीवरील ‘भावेकाका’ अशी ओळख प्रभाकर भावे यांची होती. ते अनेक वर्षे पुरुषोत्तम स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची रंगभूषा करत होते.