विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ॥
वाखरीतळावरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कीर्तन अथवा प्रवचन सुरू असते. तो ‘विज्ञान व अध्यात्माचा’ समन्वय महोत्सवच वाटतो. यातून प्रा. डॉ. कराड किती महान विश्ववैज्ञानिक विश्वतत्त्वचिंतक आहेत, याचे दर्शन घडते.
प्रा. डॉ. एस. एन. पठाण
सोमवारी (दि. २० जून) ‘जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालखीचे प्रस्थान होत आहे, तर मंगळवारी (दि. २१) तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होईल. हा पालखी प्रस्थानाचा सोहळा अवर्णनीय असतो. ग्रामीण भागातून, वाड्या-वस्तीतून आलेले लाखो वारकरी, भाविक या सोहळ्यात सहभागी होतात. यामध्ये स्त्री-पुरुष, तरुण-वृद्ध, शिकलेले-अडाणी, श्रीमंत-गरीब आणि अधिकारी ते चाकर असे सर्वच जण तितक्याच उत्साहाने कोणताही भेदाभेद न मानता आपले वयदेखील विसरून आनंदाने नाचत असतात. जणू ते मानवी अधिकाराचा समता व समानतेचा उत्सवच साजरा करताहेत, असे वाटते. नंतर हे सर्व वारकरी आपले भान हरपून पंढरपूरकडे श्री विठ्ठलाच्या (ईश्वराचे सगुण रूप) भेटीसाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व शालीनतेने ‘ग्यानबा-तुकाराम’ व श्री विठ्ठलाचा जयजयकार करीत रवाना होतात.
या वारकरी दिंडीचे ठिक-ठिकाणी नागरिक अथवा गावकरी स्वागत करताना धन्यता मानतात. मला तर त्या दिंड्यांचा स्वागत समारंभ, वारकर्यांची नम्रता व शालीनता, माऊली-माऊली म्हणत एकमेकांचे चरणस्पर्श करण्याची पद्धत पाहिल्यानंतर आपल्या महान भारतीय संस्कृतीच्या दर्शनाने मी भारावून जातो.
एकेकाळी ‘टाळकुटे’ म्हणून या वारकर्यांना हिणवणारे लोक आता तर वारीमध्ये सामील होणे, वारकर्यांचे दर्शन घेणे अत्यंत सन्मानाचे समजतात. आज एवढेच नव्हे, तर सर्व जातीधर्माचे लोक या दिंडीत भाग घेण्यासाठी धडपडतात. परदेशातून आलेले अनेक भाविकदेखील दिंडीमध्ये सामील असतात. या पायी वारीस (दिंडीस) प्राप्त झालेले हे प्रतिष्ठेचे स्वरूप पाहिल्यानंतर कुणासही महाराष्ट्राच्या या देदीप्यमान आध्यात्मिक परंपरेचा अभिमान वाटावा असेच हे सर्व वातावरण असते. संतांनी भक्तीचा अधिकार सर्वांना देऊन अखिल मानवजातीच्या समतेचे स्वप्न पूर्णत्वास नेले. भक्तीद्वारा समाजाचे चित्त शुद्ध करून सर्वधर्मसमभाव आणि समानतेचे मूळ समाजात रुजवले. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर पारलौकिक अर्थाने जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच ते सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक समता या मानवी मूल्यांचे प्रेरणास्थान आहे.
अकराव्या शतकात भक्त पुंडलिकाने बहुजन समाजाच्या पारलौकिक कल्याणासाठी सावळ्या एकेश्वर विठ्ठलाची पंढरपुरी चंद्रभागेच्या वाळवंटात स्थापना केली. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ॥’ अशा ‘बहुजनहिताय बहुजनसुखाय’ भागवत धर्माचा संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात पाया रचला. चातुर्वर्ण्यव्यवस्थेला शह देत संतांची परंपरा महाराष्ट्रात भक्कमपणे रूढ झाली. संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत चोखोबा, संत सेना न्हावी, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत एकनाथ या सर्व संतांनी पाहिलेल्या सामाजिक समतेचे आणि समताधिष्ठित समाजरचनेचे स्वप्न तुकोबांच्या काळातच १७ व्या शतकातच पूर्णत्वास गेले व संत तुकाराममहाराजांनी त्याचा कळस केला. पुढे संत शेख महंमद, संत मुंतोजी, संत वजीर उलमुल्क, संत हुसेन अंबर हे सर्व मुस्लिम संत वारकरी सांप्रदायाकडे आकर्षित झाले. पुढे तुकोबांच्या समाजोद्धाराच्या तळमळीला गुरुस्थानी मानून बहिणाबाई, कचेश्वर, निळोबा पिंपळनेरकर आदींनी तुकोबांच्या सर्वधर्मसमभावाचा वारसा पुढे नेला.
पुढे राष्ट्रसंत तुकडोेजीमहाराज, संत गाडगेबाबा नीही समानतेची चळवळ पुढे नेली आणि कर्मकांडांवर कठोर प्रहार केला. माणसाच्या सेवेतच देवाची सेवा असल्याचे त्यांनी सांगितले. याच परंपरेत महात्मा जोतिराव फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही समावेश आधुनिक काळातील संत म्हणून करावा लागेल. सांप्रदायिक सद्भावाचा हा कार्यक्रम आजही महाराष्ट्रात आणि देशात चालू आहे.
सर्वधर्मसमभाव हेच संतकाव्याचे मूळ प्रयोजन होते. ज्ञानाची द्वारे आणि भक्तीचा अधिकार सकळांना असल्याची घोषणा तुकोबांनी केली. ‘कोणाही जिवाचा न घडो मत्सर। वर्ण सर्वेश्वर पूजनाचे।’ अशा पद्धतीने समताधिष्ठित समाजाचे पाहिलेले तुकोबांचे स्वप्न त्यांच्याच काळात पूर्ण झाले.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्यावर वारकरी संप्रदायाच्या झालेल्या संस्कारातून आणि विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणेच्या स्थापनेतून त्यांना मिळालेल्या ऊर्जेमुळे त्यांनी वाखरी येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर बांधले. वारकरीबांधवांना विठ्ठलाच्या भेटीसाठी वाखरीस केव्हा पोहोचू, याची ओढ लागलेली असते. ‘वाखरी’ म्हणजे आपण विठ्ठलाच्या दर्शनासाठी इच्छित स्थळी पोहोचलो, असे वारकर्यांच्या चेहर्यावर समाधान असते. १५ दिवसांच्या पायी वारीनंतर विसावा घ्यावयाची ती जागा, त्याच ठिकाणी प्रा. डॉ. कराड सरांच्या प्रयत्नातून विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर उभे राहिले. प्रा. डॉ. कराड सरांनी वाखरी तळावर एम. आय. टी. या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून बांधलेले विश्वशांती गुरुकुल, पंढरपूर या परिसरात आषाढी एकादशीच्यानिमित्ताने लाखो वारकरी विसावा घेतात. त्यांच्यासाठी २०० स्वच्छतागृहे प्रा. डॉ. कराड सरांनी उपलब्ध करून दिली आहेत. आषाढी एकादशीला या ठिकाणी लाखो वारकर्यांना डॉ. कराड सर प्रसादाचे वाटपही करतात.
आज धार्मिक उन्मादाने केवळ भारतातच नव्हे, तर सार्या जगात उच्छाद मांडला आहे. दहशतवादाचा राक्षस समाजाचा बळी घेत आहे. सर्वसामान्य माणसाचे जीवन असुरक्षित झाले आहे. एकूणच आपल्या समाजात सध्या सांप्रदायिक सद्भाव आणि सामाजिक शांततेचा प्रश्न मूलभूत बनला आहे. लाखो वारकरी उन्हातान्हात, पावसात भिजत, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पंढरपूरकडे वाटचाल करत असताना आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतात. वारकर्यांचा हा आदर्श समोर असताना एखाद्या किरकोळ घटनेवरून हिंसक मार्गाचा अवलंब करायचा, हे थांबले पाहिजे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर केवळ पारमार्थिक अर्थाने जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच किंवा त्यापेक्षा थोडे अधिक ते सांप्रदायिक सद्भाव आणि सामाजिक समतेचे प्रेरणास्थान आहे.