वारकरी संप्रदायात विशेष स्थान असलेला ‘वारकरीसेवा पुरस्कार’ शेखर मुंदडा यांना जाहीर

वारकरी संप्रदायातील सर्वात महत्त्वाचा असा युवा संघटनेकडून देण्यात येणारा पुरस्कार म्हणून वारकारीसेवा गौरव या पुरस्काराकडे संपूर्ण वारकरी संप्रदाय पाहतो. हजारो सुशिक्षित वारकरी युवकांचे उत्तम संघटन म्हणजे वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र होय. संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणार्या ह्या पुरस्कारास वारकरी संप्रदायात विशेष स्थान आहे.
पुणे – Pune News : यंदाचा हा पुरस्कार पुणे येथील ज्येष्ठ वारकरी सेवक तथा महाएनजीओ फेडरेशनचे प्रमुख शेखर मुंदडा यांना संत श्रीज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी मंदिर येथे हजारो वारकरी वर्गाच्या उपस्थितीत श्रीगुरु प्रमोदमहाराज जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
तब्बल एक महिना विशेष काम करून तयार करण्यात आलेली श्री पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती व गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. याप्रसंगी श्री ज्ञानेश्वरी कंठस्थ श्री एकनाथमहाराज कोष्टी, संत ज्ञानेश्वरमहाराज मंदिराचे उपाध्याय श्रीराजाभाऊ चौधरी, मंदिर संस्थानचे मुख्य व्यवस्थापक श्रीज्ञानेश्वरजी वीर आदी मान्यवर उपस्थित होते.
अत्यंत सन्मानाचा समजला जाणारा ‘वारकरीसेवा पुरस्कार’ मला मिळाला आहे. हा पुरस्कार माझे गुरुदेव श्री श्री रविशंकरजी, माझे मार्गदर्शक श्री चंद्रकांतजी राठी व महाएनजीओ फेडरेशनचे सर्व सहकारी यांना आदरपूर्वक समर्पित करतो. या पुरस्काराने माझ्यावर कार्याची अधिक जबाबदारीदेखील वाढली आहे. माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण सुवर्णक्षण म्हणजे श्री माऊलींच्या दरबारात मला सन्मानित करण्यात आले.
_शेखर मुंदडा, ज्येष्ठ वारकरी सेवक तथा महाएनजीओ फेडरेशनचे प्रमुख
वारकरी संप्रदायांच्या साधक तथा प्रबोधकांची कोविड काळात केलेली विशेष सेवा, वारी कालावधीत वारकरी सेवा रथ माध्यमातून केलेली हजारो वारकरीबांधवांची सेवा, पंढरपूर येथील चंद्रभागामाता मंदिर जीर्णोद्धारकार्य, देहू येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथील लाखो वृक्षलागवड व संवर्धन उपक्रम असे वारकरी संप्रदाय व साधकजनांच्या केलेल्या सेवेबद्दलचा गौरव म्हणून मुंदडा यांना वारकरीसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे, असे गौरवोद्गार श्री प्रमोदमहाराज जगताप यांनी मुंदडा यांच्याविषयी काढले.
यावेळी वारकरी संप्रदाय युवा मंचचे अध्यक्ष अक्षयमहाराज भोसले, कार्याध्यक्ष शशिकांत काटे व समस्त राज्य कार्यकारिणी उपस्थित होते. ज्येष्ठ कीर्तनकार चंद्रकांतमहाराज वांजळे, प्रमोदमहाराज पवार, बजरंगमहाराज आंधळे, विश्वासजी कळमकर आदी मान्यवर तथा महाएनजीओ फेडरेशनचे संचालक मुकुंद शिंदे, संचालिका विद्या काबरा व उद्योजक योगेश बजाज
उपस्थित होते.