प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंह यांच्या निधनाने संगीत सृष्टीवर पुन्हा शोककळा

Bhupinder Singh Died | प्रसिद्ध गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. अंधेरीतील सिटी केअर रुग्णालयात सायंकाळी ७.४५ मि. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. भूपिंदर सिंह हे मागील काही दिवसांपासून अनेक आजारांचा सामना करत होते.
भूपिंदर सिंह यांच्या निधनाची वार्ता त्यांच्या पत्नी मिताली सिंह आणि मुलगा अमनदीप सिंह यांनी दिली. मागील सहा महिन्यांपासून ते कोलन कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराशी झुंज देत होते असंही त्यांनी सांगितलं आहे. दहा दिवसांपूर्वी भूपिंदर सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांना कोरोनाची देखील लागण झाली होती. अशी माहिती डॉक्टरांनी दिली. त्याचबरोबर सोमवारी सकाळपासून सिंह यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावली होती, त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, सायंकाळी त्यांचं हृदय बंद पडल्याने त्यांचा श्वास थांबला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
मागील सहा महिन्यांत देशातील अनेक गायकांचे निधन झाले आहेत. लता मंगेशकर यांच्या नंतर बप्पी लहिरी आणि इतरही अनेक गायिकांच्या निधनानं भारतीय संगीत सृष्टी आणि चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
भूपिंदर सिंह यांचे अनेक गाणे सदाबहार राहिलेले आहेत. ‘मौसम’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘दूरियाँ’, ‘हकीकत’ अशा अनेक चित्रपटांतील हिट गाण्यांमुळे त्यांची चांगलीच ओळख झाली होती. त्यांच्या लोकप्रिय गाण्यांमध्ये, ‘मेरा रंग दे बसंती चोला’, ‘नाम गुम जायेगा’, ‘प्यार हमें किस मोड पर ले आया’, ‘हुजूर इस कदर’, ‘एक अकेला इस शहर में’, ‘जिंदगी मिलके बिताएंगे’, ‘बीती ना बितायी रैना’ अशा अनेक गाण्यांचा समावेश आहे.