पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

उद्यान विभागाला जाग कधी येणार?

येरवड्यातील इंद्रप्रस्थ उद्यान बनले डुकरांचा अड्डा

उद्यान बंद अवस्थेत असल्यामुळे कोणत्या आधारावर व नियमावर पालिका उद्यान अधिकार्‍यांनी तिकीट विक्रीचा नामफलक लावला आहे. यासंदर्भात नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. तर अनेक नागरिक उद्यानातील मोकळ्या जागेचा वापर जुगार खेळण्यासाठी करीत असल्याने हे उद्यान आहे की, जुगाराचा अड्डा, असा प्रश्न या भागातून जाणार्‍या नागरिकांना पडत आहे.

येरवडा : येरवडा परिसरातील इंद्रप्रस्थ उद्यानाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत आहे. उद्यानेच डुकरांचा अड्डा बनली आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे सूर पसरले असून, झोपी गेलेल्या पालिका उद्यान विभाग अधिकार्‍यांना जाग येणार केव्हा, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या व थोर महापुरुषांची ओळख असणार्‍या येरवडा उपनगर भागात सर्वात प्रथम येरवडा परिसरात पालिका उद्यान विभागाच्या वतीने परिसरातील जयजवाननगर, लक्ष्मीनगर, डॉ.आंबेडकर वसाहत आदी भागातील ज्येष्ठ नागरिकांसह बालचमूंना खेळण्यासाठी या परिसरात उद्यान उभारण्यात आले होते. त्यादरम्यान परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी झुकझुकगाडी, झुला आदी खेळण्यांची सुविधा करण्यात आली होती. मात्र सध्या असलेले उद्यान हे ओसाड पडले आहे. काही महिन्यांपूर्वी उद्यानाचे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सजावटीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र सध्या उद्यानाचे प्रवेशद्वार जरी दगडात करण्यात आले असले तरी पण ते अर्धवट अवस्थेत आहे.

हे उद्यान जवळपास अर्धा ते १ एकरमध्ये बनविण्यात आले होते. उद्यानातील झुकझुकगाडी गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातून गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिसरात पावसाचे पाणी साचल्यामुळे परिसर चिखलमय होऊन परिसरात डासांच्या प्रमाणात वाढ झाल्याने साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या महाभयंकर आजारांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. तर लहान मुलांना खेळण्यासाठी बसविण्यात आलेली खेळणीच गायब झाल्यामुळे उद्यानात पालिका अधिकार्‍यांचे किती लक्ष आहे, हे यामुळे स्पष्ट दिसून येत आहे. अधिकार्‍यांच्या संगनमताने परिसरातील खेळणी गायब झाली की, काय, अशी शंका नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. कारण अनेक वर्षांपासून असलेले उद्यान हे धूळ खात पडून असल्यामुळे उद्यानाला वाली कोण, असाही सवाल परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

उद्यानात पालिका उद्यान विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसह पादचारी नागरिकांसाठी फुटपाथदेखील नाहीत. पालिका विद्युत विभागाच्या वतीने उद्यानात कोणत्याही प्रकारचे विद्युत दिवे नसल्यामुळे रात्रीच्या सुमारास परिसर अंधारमय होत आहे. यामुळे रात्री मध्यरात्रीच्या सुमारास जाणार्‍या पादचारी नागरिक अथवा दुचाकीस्वारांना जीव मुठीतच घेऊन जाण्याची वेळ येत आहे. कारण परिसरात भुरट्या चोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच उद्यानात रात्रंदिवस डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बनविण्यात आलेले उद्यान हे नागरिकांसाठी आहे की, डुकरांसाठी असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडत आहे.

कारण उद्यानासाठी करण्यात येणारा खर्च जनतेच्या खिशातून करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कारण अधिकार्‍यांच्या खिशातून एक दमडीदेखील खर्च होत नसल्याने त्यांना याचे काही देणेघेणे नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात झाडीझुडपे वाढल्यामुळे व त्यातच पावसाचे दिवस असल्यामुळे सरपटणार्‍या प्राण्यांची भीतीही व्यक्त होत आहे. उद्यानांलगतच एक महाविद्यालय व अग्निशामक पथक विभागाचे कार्यालय असल्याने विद्यार्थ्यांसह अग्निशामक दल अधिकारी व कर्मचारी यांना दुरवस्था झालेल्या उद्यानाचा नाहक त्रास होत आहे.

उद्यानामध्ये माळी सोडाच, पण साधा सुरक्षारक्षक देखील नेमण्यात न आल्याने पालिका उद्यान विभाग अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे. प्रवेशद्वारावरच उद्यान विभागामार्फत तिकीटविक्री बाबत नामफलक लावण्यात आला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या उद्यानावर असे फलक कसे, याचा विचार आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये