यशोगाथा! “आयुष्यात निर्णय घ्यायला ‘धाडस’ महत्त्वाचे”

समृध्दी महामार्ग ही मुंबई ते नागपूर हा राज्याच्या राजधानी ते उपराजधानीला जोडणारा महामार्ग आहे. खऱ्या अर्थाने समृध्दी, विकास करणार महामार्ग आहे. या महामार्ग निर्मितीच्या सगळ्या टप्प्यांना यशस्वीपणे व निर्धारित कालावधीत पूर्णत्वास नेणारे एमएसआरडीसीचे ज्येष्ठ- वरिष्ठ अधिकारी अनिलकुमार गायकवाड यांनी दै. राष्ट्रसंचारच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी विशेष प्रतिनिधी रमेश जाधव उपस्थित होते. यावेळी सहसंपादक मधुसूदन पतकी यांनी त्यांच्याशी साधलेल्या संवादाचा हा संपादित भाग.
लहानपणापासून शिक्षणाची आवड… मनी ध्यास-जिज्ञासा -ध्येय या जोरावरती तसेच शिक्षकीपेक्षा असणाऱ्या घरात वावरताना महाराष्ट्रात नव्हे तर देशात नावलौकिक करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिल गायकवाड यांची यशोगाथा दै. राष्ट्रसंचारच्या माध्यमातून वाचकांसमोर ठेवत आहोत.
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या अनिल गायकवाड यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मोठे यश संपादन केले आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या समृद्धी महामार्गाचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. हा समृद्धी महामार्ग ७०१ कि.मी. असून यामध्ये १० जिल्हे, २६ तालुके, ३९२ गावे जोडली गेली आहे. अशा समृद्धी महामार्गाची ओळख आता महाराष्ट्रात नव्हे देशात झाली आहे. या समृद्ध महामार्गाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. तो सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
अनिलकुमार गायकवाड हे सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाचे माजी सचिव आहे. त्यांचे महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागात खूप मोठे योगदान आहे. त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
सुरुवातीपासूनच सार्वजनिक बांधकाम विभागात काम करण्याची इच्छा असणारे अनिलकुमार गायकवाड यांनी वयाच्या सतराव्या वर्षी लातूरमधून डिप्लोमा पूर्ण केला. पुढे शिकण्याची तीव्र इच्छा असल्याने त्यांनी तूर्तास नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उमरगा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयात सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगचे व्होकेजनल कोर्सेसमध्ये अध्यापनासाठी त्यांना विचारण्यात आले. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांच्या करिअरची सुरुवात शिक्षकी पेशाने झाली. तिथे अध्यापन करत असताना ते पुढील शिक्षणाचे अध्ययन सुद्धा करत होते. करिअरची पुढील वाटचाल अभियंता म्हणूनच करायची असे त्यांनी ठामपणे मनात ठरवलेले होते.
एखाद्या अभियंत्याची मानसिकता असते त्याप्रमाणे त्यांनाही सार्वजनिक बांधकाम विभागात काम करण्याची इच्छा त्यांना त्यांच्या कॉलेजपासून होती. १९८० साली लातूरच्या पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकेची पदविका घेतल्यानंतर गायकवाड यांनी उमरगा येथील शिवाजी महाविद्यालयात काही काळ कनिष्ठ प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याच काळात गायकवाड यांनी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी आणि तितकीच अवघड असणारी एएमआयईची ग्रुप ए ही परीक्षा उत्तीर्ण केली. विश्वास बसणार नाही पण गायकवाड यांची शासकीय सेवेची सुरुवात पाटबंधारे विभागातून झाली. सुरुवातीला पाटबंधारे खात्यात त्यांनी मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पावर काम केले.
एप्रिल १९८९ मध्ये ते सार्वजनिक बांधकाम विभागात प्रथम वर्ग अधिकारी म्हणून नियुक्त झाले. १९९० मध्ये ठाण्यात सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर गायकवाड यांनी मागे वळून पाहिले नाही. कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक आणि शेवटी सचिव अशी अचंबित करणारी कारकीर्द त्यांची आजपर्यंत राहिली. वयाच्या सतराव्या वर्षी अध्यापन करत ते आता राज्याच्या बांधकाम विभागात बहुमुल्य योगदान आहे. यावेळी दै. राष्ट्रसंचारशी गप्पागोष्टी करताना गायकवाड म्हणाले की, अमेरिका श्रीमंत आहे कारण तिथे चांगले रस्ते आहेत. अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे हे वाक्य केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणात नेहमी सांगतात. कोणत्याही भागाचा विकास हा स्थानिक ठिकाणी दळण-वळणाची साधने किती चांगल्या दर्जाची आहेत, यावर ठरतो. त्यामुळे राज्याच्या किंवा देशाच्या विकासासाठी रस्ते विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्यातील रस्त्यांचे जाळे विकसित झाले, तर आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे ते सांगतात.
त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि विकासापासून दूर राहिलेल्या भागाला समृद्धीच्या महामार्गावर आणण्यासाठी मुंबई ते नागपूर असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उभारण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्प्यातील प्रवासी वाहतुकीचे लोकार्पण झाले. हे काम पूर्ण करण्यासाठी अनेक सकारात्मक आणि ऊर्जावान मानवी शक्ती आपले योगदान देत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या नावाची गणना केली जाते.
अनिलकुमार गायकवाड यांनी अनेक महत्त्वाच्या कामातून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यापैकी पुणे -मुंबई एक्स्प्रेस वे, मुंबईतील सी-लिंक पूल, मुंबई आणि ठाणे शहरातील जवळपास सर्व उड्डाणपुले, समृद्धी एक्स्प्रेस वे, मुंबई मधील विलासराव देशमुख फ्री वे, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचे आधुनिकीकरण केलेली इमारत, मुंबई हायकोर्ट इमारत दुरुस्ती, हाई माऊंट बिल्डिंग, सह्याद्री इमारत, विशेष म्हणजे देशाच्या राजधानी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन नुकतेच लातुर जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धाटन केलेले देशातील पहिले नवीन टेक्नॉलॉजीचे हायब्रीड पूल, देशातील नदीवर तयार केलेले सर्वांत उंच लोखंडी पूल, देशातील सर्वाधिक लांब असा आठ किलोमीटरचा बोगदा, अशी अनेक महत्त्वाकांक्षी कामे गायकवाड यांच्या कार्यकाळात त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे हाताळली आहेत. मंत्रालय पुनर्बांधणी योजनेत अनिलकुमार गायकवाड यांचा सिंहाचा वाटा होता. केवळ गायकवाड यांच्या अभियांत्रिकी कौशल्यामुळे मंत्रालय इमारतीला अल्पावधीत पूनर्वैभव प्राप्त झाले. ९ ते १० वर्षांपूर्वी मंत्रालयाला नवी झळाळी देणारे अनिलकुमार गायकवाड यांचा प्रवास हा थक्क करणारा आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या गायकवाड यांनी बांधकाम विभागाच्या सचिवपदापर्यंत झेप घेतली. सहायक अभियंता ते सचिव हा प्रवास सहजसोपा नव्हता. मात्र, आपल्या कर्तृत्वाच्या आणि कामाच्या जोरावर गायकवाड यांनी सचिवपदाला गवसणी घातली. ‘रिझल्ट’ देणारे, आव्हान पेलणारे, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता असलेले अधिकारी म्हणून गायकवाड यांचा संपूर्ण विभागात दबदबा आहे.