‘…अमेरिकेचा राष्ट्रपती संजय राऊतांना हुंगतो तरी का?’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राणा दाम्पत्यानं मुंबईत मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करू असा इशारा दिल्यानंतर मोठा वाद सुरू आहे. तसंच आज नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दुपारी माध्यमांशी बोलताना मातोश्रीवर जाणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्याच्या मागे भाजपा असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एक तर संजय राऊतांना विचारतं कोण? त्यांचं महत्व काय? संजय राऊत हेही म्हणू शकतात की अमेरिकेच्या राष्ट्रपतींना मी घाबरत नाही. अमेरिकेचा राष्ट्रपती त्यांना हुंगतो तरी का? संजय राऊत त्यांना माहिती तरी आहेत का? त्यामुळे ही अशी रोजची वक्तव्य करून ही असल्या प्रकारची कागदी लोकं राजकारणात फार काही परिवर्तन करू शकत नाहीत”.
“संजय राऊतांना आम्ही फार काही गांभीर्यानं घेत नाहीत. त्यांचा पक्षही गांभीर्यानं घेत नाही. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की ते सौजन्याची भाषा करतात. सौजन्य होतं कधी त्यांच्याकडे? ज्या प्रकारे तुम्ही मीडियासमोर बोलताय, तुमची वक्तव्य घरात परिवारासोबत बसून ऐकता येत नाहीत. हे शिवराळ लोक आहेत. हे राजकारणी थोडी आहेत”, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत.