राष्ट्रवादीही हिंदुत्वाच्या स्पर्धेत उडी घेणार का? रोहीत पवार म्हणाले…
अयोध्या : सध्या राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार अयोध्या दौऱ्यावर आहेत. ते सहकुटुंब अयोध्या दौऱ्यावर गेले असून यावेळी त्यांनी राज्यातल्या परिस्थितीबद्दल भाष्य केलं आहे. राज ठाकरेंवरही त्यांनी अयोध्येत टीका केली आहे. फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना जनतेनं नाकारलं असं रोहीत पवार म्हणाले. तसंच या दौऱ्यानिमित्त उपस्थित होणाऱ्या प्रश्नांचीही उत्तर त्यांनी दिली आहेत.
रोहित पवार यांनी अयोध्या दौरा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. आता राष्ट्रवादीही हिंदुत्वाच्या स्पर्धेत उडी घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यालाच रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे. पवार म्हणाले, “नाही मी राष्ट्रवादीचा आमदार म्हणून मी इथे आलेलो नाही. मी रोहित पवार म्हणून इथे आलेलो आहे. आणि माझा स्वतःचा असा काही विचार असू शकतो. माझा विचार मला जे सांगतो, की जिथे गेल्यावर मला प्रसन्न वाटतं, मला बरं वाटतं, एक दिशा मिळते, अशा प्रेरणा ठिकाणी मी नेहमी जात असतो. धार्मिक विषय हे व्यक्तिगत असतात, त्याची कोणीही टिमकी वाजवत राजकारण करू नये हे माझं मत आहे. मग ते भाजपासाठी असेल किंवा आता ज्या पद्धतीने मनसे वागतेय त्याबद्दलही असू शकतं.”
पुढे रोहित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात तोडातोडीचं राजकारण स्वीकारलं जाणार नाही. आपल्यासाठी एकी, एकता, समानता महत्त्वाची. आणि गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही समाजांमध्ये काही वाद झाला नाही, त्यावरून लोकांना काय हवंय ते त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यामुळे त्याच्यावरून ठरवावं की तोडातोडीचं राजकारण करावं की नाही. करायचंच असेल तर विकासाचं राजकारण करा”.