पती आणि सासूचे केले होते तुकडे, एका वर्षानंतर ‘असे’ उकलले हत्येचे सापळे
दिसपूर | Crime News – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानं (Shraddha Walker Murder Case) संपूर्ण देश हादरला होता. तसंच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आसाम येथे एका महिलेनं तिचा पती आणि सासूची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेनं आपल्या मित्रांच्या मदतीनं तिचा पती आणि सासूची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात घडला होता. तर पती आणि सासूची हत्या केल्यानंतर ते दोघे हरवले असल्याची तक्रार आरोपी महिलेनं पोलिसांत दिली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी महिलेनं तिचा प्रियकर आणि त्याचा मित्र अशा दोघांच्या मदतीनं पती आणि सासूची हत्या केली. हत्येनंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर त्यांचे मृतदेह मेघालयातील दऱ्यांमध्ये फेकून देण्यात आले.
पोलिसांनी सांगितलं की, आरोपी महिला बंदना कलितानं जुलै 2022 मध्ये तिचा पती आणि सासू हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये मृतकांच्या एका नातेवाईकानं गुवाहाटीतील एका पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यावेळी हत्या झाल्याची शक्यता असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी एफआयआरच्या आधारावर तपास सुरू केला. पोलिसांनी बंदनावर संशय घेत तिची कसून चौकशी केली आणि बंदनाने दोन्ही हत्यांची कबूली दिली.
गुवाहाटीचे पोलिस कमिश्नर दिगंता बाराह यांनी सांगितलं की, हत्या झालेल्यांची ओळख अमरज्योति डे (आरोपी महिलेचा पती) आणि शंकरी डे (आरोपी महिलेची सासू)अशी पटली आहे. तर आरोपी महिला बंदना कलिता आणि तीचे दोन मीत्र धनजीत डेका आणि अरुप दास या दोघांना अटक करण्यात आली आहे.