कोणतेही शास्त्र जगाचे कोडे उलगडते; वादक पं. जयराम पोतदार यांचे मत

पुणे : यशस्वी कलावंत होण्यासाठी चांगल्या गुरूचे मार्गदर्शन आणि अखंड साधना हवी. गुरूने कितीही शिकवले तरी सगळंच आपण शिकतो असे नाही. तरीही आपण किती आत्मीयतेने शिकतो हे महत्त्वाचे आहे. श्वास घेणे आपण थांबवत नाही, तसा रियाजही थांबवू नये. शास्त्र आणि कला या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. शास्त्र हे जगाचे कोडे उलगडते, तर कला हे जगाचे शास्त्र घडवते, असे मत पं. जयराम पोतदार यांनी व्यक्त केले.
तालमार्तंड कै. रंगनाथबुवा देगलूरकर पुरस्कार तबलावादक संजय करंदीकर (पुणे) आणि पं. आनंद बदामीकर (सोलापूर) यांना प्रदान करण्यात आला. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ तबलावादक पं. विनायक फाटक, शिवदास देगलूरकर उपस्थित होते. कोरोनामुळे खंडित झालेले मागील दोन वर्षांचे पुरस्कार यावर्षी प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात पं. संजय करंदीकर आणि पं. आनंद बदामीकर यांचे वादन झाले. आसावरी देसाई देगलूरकर यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांना नरसिंग देसाई (संवादिनी) ओंकार देगलूरकर (तबला) यांनी साथसंगत केली. पं. विनायक फाटक म्हणाले, आताच्या काळात सगळेच गुरू झालेत. पूर्वी कलेतील दिग्गजांना गुरुपद मिळायचे. ते गुरू म्हणजे कलेचे विद्यापीठच असायचे. शिकणार्याला मुक्तहस्ताने ते द्यायचे, विद्यार्थ्यांवर सर्व संस्कार करायचे, असेही त्यांनी सांगितले.
शिवदास देगलूरकर म्हणाले, तालमार्तंड कै. रंगनाथबुवा देगलूरकर यांच्या सांगीतिक कार्याच्या स्मृती उजागर करण्यासाठी तालवादन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या कलाकाराला तालमार्तंड कै.रंगनाथबुवा देगलूरकर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. प्रास्ताविक आसावरी देसाई देगलूरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.