ताज्या बातम्यादेश - विदेश

दिल्लीत प्रदूषणाचे संकट गंभीर! विषारी धुरक्याने शहराला वेढले

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत प्रदूषणाने या आठवड्यात कळस गाठला आहे. दिल्लीतील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) गुरुवारी सकाळी ८पर्यंतच्या २४ तासांत गंभीर श्रेणीत ४३० ते ५६७ अंकांपर्यंत पोहोचला. धूर आणि धुक्याचे मिश्रण असलेल्या विषारी धुरक्याचा पडदा गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी साऱ्या दिल्लीला वेढून राहिल्याने डोळे जळजळणे, खोकला, शिंका येणे, सदर्दी, उलट्या, श्वासोच्छवास करण्यास त्रास होणे या समस्यांनी दिल्लीकरांना, त्यातही लहान मुलांना हैराण केले.

या धुरक्यामुळे किमान ३०० विमाने व अनेक रेल्वेगाड्यांच्या गमनागमनावर विपरित परिणाम झाला. दिल्लीतील ३१ भागांत सकाळी प्रदूषण गंभीर श्रेणीत पोहोचल्यावर जाग आलेल्या वायूगुणवत्ता व्यवस्थापन आयोगाला (सोक्यूएएम) जाग आली व त्यांनी उद्यापासून म्हणजेच शुक्रवारपासून ग्रेप म्हणजे ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन लागू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये राष्ट्रीय स्तरावर आवश्यक बांधकामे वगळता सर्वसामान्यांच्या नव्या बांधकामांवर पूर्ण बंदी असेल. पाचवीपर्यंतच्या शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे.

दिल्लीतील धूळभरल्या रस्त्यांवर पाण्याचा फवारा करणाऱ्या वाहनांची संख्याही वाढविण्यात आली आहे. दाट धुरक्यामुळे दिल्ली विमानतळावर गुरुवारी ३०० हून अधिक उड्डाणांना विलंब झाला. दुपारपर्यंत ११५ विमाने दिल्लीत उतरली व २२६ विमानांचे उड्डाण झाले. विमानांच्या गमनागमनाला सरासरी तास ते दीड तास उशीर होत होता. अनेक रेल्वेगाड्या गुरुवारीही रद्द करण्यात आल्या. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्ली एनसीआरमध्ये गेल्या २४ तासांत किमान तापमानात घट झाल्यामुळे दिल्लीकरांना यंदाच्या थंडीची पहिली जाणीव झाली आहे. दिल्लीत गुरुवारी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३० व १४ ते १८ अंश सेल्सिअस राहिले. आगामी किमान आठवडाभर तरी धुरके आणि प्रदूषणाचा दुहेरी फटका दिल्लीकरांना सहन करावा लागू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये