फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर केला योग दिवस साजरा

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उपस्थिती
पुणे- Pune News | आठव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पुणे मेट्रो, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (NIN), लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने फुगेवाडी मेट्रो स्थानकात लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत सामूहिक योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले.
यंदाच्या आठव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाची संकल्पना आहे, ‘योगा फॉर ह्युमॅनिटी’.महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, डॉ. के. सत्यालक्ष्मी, संचालक, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था आणि पी. एम. पार्लेवार, संचालक, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, महाराष्ट्र हेदेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
सकाळी ६ वाजता पुणे मेट्रोच्या फुगेवाडी स्थानकात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन करून योगदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
त्यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या महाराष्ट्र आणि गोवा येथील कर्मचार्यांनी योगा गाण्यांचे थेट सादरीकरण केले. पंतप्रधानांनी म्हैसूर, कर्नाटक येथून राष्ट्राला संबोधित केले. त्यानंतर देशभरात योगसत्र सुरू झाले. फुगेवाडी मेट्रो स्थानकावर झालेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या सोहळ्यात ५०० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला.