“…त्यांच्यासाठी तू अमर झालास”; सुशांत सिंहच्या बहिणीची भावनिक पोस्ट

मुंबई | Sushant Singh Rajput – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दोन वर्षांपूर्वी सुशांतचा मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी मृतदेह आढळला होता. त्याच्या मृत्युप्रकरणी अद्यापही पोलिसांकडून तपास सुरू आहे. तसंच सुशांतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडसह देशभरात मोठी खळबळ उडाली होती. दोन वर्षे उलटून गेल्यानंतर सुशांतच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे. सुशांतची आत्महत्या ही हत्या असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर आजही त्याच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी सीबीआय चौकशी सुरु आहे. दरम्यान सुशांतच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त त्याची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
श्वेता सिंह किर्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुशांतचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुशांत एका गरजू मुलासोबत गप्पा मारताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना श्वेता भावूक झाली आहे.
“भाऊ, तुझ्या निधनाला आज २ वर्षे पूर्ण झाली, पण तू ज्या मुलांसाठी उभे राहिलास, त्यांच्यासाठी तू अमर झालास. विनम्रता, करुणा आणि प्रेम ही तुझी ताकद होती. तुला सर्व लोकांसाठी खूप काही करायचे होते. तुच्या सन्मानार्थ आम्ही तुझे ते गुण आणि आदर्श पाळत राहू. भाऊ तू जग चांगल्यासाठी बदलले आहे आणि तुझ्या अनुपस्थितीतही आम्ही त्या आदर्शांचे पालन करत राहू. त्यामुळे आज आपण सर्वांनी मिळून दिवा लावूया आणि निस्वार्थ भावनेने कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य आणूया”, असं श्वेताने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, १४ जून २०२० या दिवशी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या बातमीने संपूर्ण देश हादरून गेला होता. सुशांतने १४ जून २०२० सालामध्ये वांद्रे इथल्या त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंर मुंबई पोलिसांनी सुशांतच घर गाठत तपास सुरु केला. सुशांतच्या घरात अशी काही औषधं सापडली ज्यामुळे सुशांत नैराश्यात होता असा अंदाज लावण्यात आला. तर नैराश्य हेच सुशांतच्या आत्महत्येचं कारण असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला.