झिरो माइलस्टोन पदपथ सुशोभीकरणाचे वाजले बारा

पुणे : शहरातील जनरल पोस्ट ऑफिसजवळ झिरो माइलस्टोन पदपथावर महानगरपालिकेतर्फे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मात्र, येथे पालिकेचा सुरक्षारक्षक नसल्याने जागेचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले. याच ठिकाणाहून पुण्याची चोहोबाजूची अंतराची गणना केली जाते.
दोन वर्षांपूर्वी या जनरल पोस्ट ऑफिस समोरच्या पदपथावर पालिकेकडून उत्कृष्ट प्रतीचे सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र, या स्थळाचा ताबा हा भिक्षेकरांनी घेतलेला आहे. त्यामुळे पुणे शहरातील तसेच बाहेरगावाहून येणारे नागरिक याठिकाणी फिरकत देखील नाही. झिरो माइल स्टोनचा आकर्षक नामफलक तसेच बसण्यासाठी व्यवस्था व आकर्षक अशा मूर्तींची रचना येथे करण्यात आली आहे.
परंतु, काही उपद्रवी लोकांनी मूर्त्यांची तोडफोड केली आहे. तसेच खानपान झाल्यानंतर तेथेच कचरा टाकण्यात येतो. मूर्त्यांची तोडफोड, बसण्याची व्यवस्थेची फरशीच फोडणे असे दुष्कृत्य करण्यात आले आहे. येथे असलेल्या झाडांच्या कप्प्यामंध्ये जुने कपडे कोंबल्यामुळे सुशोभिकरणाची रयाच निघून गेलेली आहे. ते आकर्षक वाटणे ऐवजी किळसवाणे वाटू लागले आहे. बसण्याच्या जागेजवळच शिळे अन्न फेकलेले असते. रात्री बेरात्री या जागेवर लघुशंका केली जात असल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. महापालिकेने मध्यवर्ती भागातील असलेल्या या महत्त्वाच्या व आकर्षक अशा जागेचे नियमितपणे जोपासना करायला हवी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.