ताज्या बातम्यारणधुमाळी

‘…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा मला मानसन्माने मंत्रिमंडळात घेतील’- संजय राठोड

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. माझ्यावरील आरोपांच्या प्रकरणाची चौकशी झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला पुन्हा मानसन्मानाने मंत्रिमंडळात घेतील, अशी आशा संजय राठोड यांनी व्यक्त केली आहे. तसंच मंत्रिपदाची संधी मिळाली तर आणखी चांगलं काम करू, असंही संजय राठोड यांनी स्पष्ट केलं आहे. ते वाशिममध्ये एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

यावेळी संजय राठोड म्हणाले, “जेव्हा मी स्वतःहून राजीनामा दिला होता तेव्हा आपल्या चॅनलसमोर येऊन हेच बोललो होतो की महाराष्ट्रात अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण सुरू आहे. ३० वर्ष सामाजिक, राजकीय जीवनात मी चारवेळा प्रचंड मतांनी निवडून आलोय. कोणीही असे आरोप करून माझे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रकार झाला तो अतिशय निंदनीय आहे. मी राजीनामा देतो, चौकशी होऊ द्या. त्याप्रमाणे मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला.”

“मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला होता तेव्हा म्हटलं होतं की माझी चौकशी करा. मला परत मंत्रिपदाची जबाबदारी द्यायची की नाही त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला संधी दिलीच होती, मात्र घाणेरड्या राजकारणामुळे मला राजीनामा द्यावा लागला. मी स्वतःहून तो राजीनामा दिला. त्यांनी तो स्विकारला,” असं संजय राठोड यांनी सांगितलं आहे.

पुढे ते म्हणाले की, “या प्रकरणाची चौकशी झाल्यावर ते पुन्हा मला मानसन्मानाने मंत्रिमंडळात घेतील. त्यांनी मंत्रिपदाची संधी दिली तर मला आणखी चांगलं काम करता येईल. येणाऱ्या काळात पोहरागडचा विकास आणि इतर महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न सर्वांना त्या पदावर राहून न्याय देता येईल.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये