‘…लातूरपर्यंत रस्ता बीडनं काय घोडं मारलंय का?’; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भाजपावर निशाणा
बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमधील एका सभेत बोलताना बीडमधील रस्त्यांच्या परिस्थीवरुन विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. “आम्ही लातूरवरून निघालो. लातूरच्या सीमेपर्यंत चारपदरी रस्ता. पण बीड आल्यावर रस्ता झाला दोन पदरी. मी धनंजयला (मुंडे) म्हटलं काय आहे हे? तो म्हणाला दादा आम्ही ८ तास उपोषण केलं. ओरडत होतो. पण त्या वेळच्या नेतृत्वानं इथे लक्षच दिलं नाही. इकडं रस्ता दोन पदरीच राहिला, तिथे चार पदरी झाला”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
“त्या भागातल्या नेतृत्वानं भांडून पैसा आणायचा असतो. त्यांनी त्या वेळी करायला हवं होतं. इथपर्यंतच का? लातूरपर्यंत रस्ता आणि बीडनं काय घोडं मारलंय का? शेवटपर्यंत चारपदरी रस्ता व्हायला हवा होता. आता राहिलं ना काम अर्धवट”, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.
पुढे अजित पवार म्हणाले “हे राष्ट्रीय महामार्गाचं काम आहे. नितीन गडकरींच्या खात्याचं काम आहे. मग खासदार काय करतात? खासदारांचं हे काम नव्हतं का? बोललं पाहिजे, भांडलं पाहिजे, मुद्दे मांडले पाहिजेत. लोकप्रतिनिधी कमी पडला, तर ही अवस्था होते. त्यामुळे इथून पुढच्या काळात विचारपूर्वक उमेदवारांना निवडून देण्याचं काम जनतेनं करावं.”