लालबागचा राजा मंदिरातील घटना! दर्शन घ्यायला गेली अन् तरुणी रांगेतच कोसळली

राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष दिसून येत आहे. अशातच पुणे, मुंबई या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. बाप्पाच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी गर्दी होत आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी कानाकोपऱ्यातून भाविक दाखल होत आहे. अशातच दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागमध्ये मोठी गर्दी झाली आहे.
दरम्यान, लालबागच्या राज्याच्या मंडपात एकाच वेळी झालेल्या मोठ्या गर्दीमुळे एका तरुणीला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली. तास न् तास रांगेत उभं राहिल्यामुळे या तरुणीला घाम फुटला आणि तिची प्रकृती बिघडली.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे मोठा गोंधळ झाला. तरुणी खाली कोसळताच रांगेत उभ्या असलेल्या इतर भाविकांनी तिची मदत केली. काही भाविकांनी तिला बाजूला बसवलं. तर तिच्या तोंडावर पाणी मारलं.
दर्शनासाठी आलेल्या या मोठ्या गर्दीत या तरुणीवर तात्काळ उपचार करण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्याने तरुणी शुद्धीत आली. आता तिची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.