देश - विदेशविश्लेषण

वाघांच्या हल्ल्यात सर्वाधिक बळी

महाराष्ट्र राज्यात दोन वर्षांत १०८ मृत्यू

नागपूर : भारतात दोन वर्षांत वाघाच्या हल्ल्यात १०८ नागरिक मृत्युमुखी पडले. त्यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. २०१९ ते २०२१ या कालावधीतील हे मृत्यू आहेत. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

भारतात वाघांच्या हल्ल्यात २०१९ मध्ये ५०, तर २०२१ मध्ये १४ मृत्यूंची नोंद आहे. या १४ मृत्यूंपैकी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी पाच, बिहारमध्ये तीन आणि उत्तराखंडमध्ये एका मृत्यूची नोंद आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेशमध्ये अलीकडच्या वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकही मृत्यू नाही. याच आधारावर अश्विनी कुमार चौबे यांनी मानवी मृत्यूच्या संख्येत घट झाल्याचा दावा केला आहे.

आकडे काय सांगतात?
२०१९ ते २०२१ दरम्यान महाराष्ट्रात वाघांच्या हल्ल्यात ५६ मृत्यू झाले. त्यापैकी २०१९ मध्ये २६ मृत्यू, २०२० मध्ये २५ आणि २०२१ मध्ये पाच मृत्यू झाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये याच कालावधीत वाघाच्या हल्ल्यात १७ माणसे मृत्युमुखी पडली असून, २०१९ मध्ये आठ, २०२० मध्ये चार आणि २०२१ मध्ये पाच मृत्यू झाले आहेत.

महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष वाढतच आहे. वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात माणसे मृत्युमुखी आणि जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, मानव-वन्यजीव संघर्षाला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने तीन मानक कार्यपद्धती तयार केल्या आहेत. या तिन्ही कार्यपद्धतींत वाघांना मोठ्या क्षेत्रावर थांबवणे, मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी पशुधनाचे व्यवस्थापन करणे, वाघ कमी असलेल्या भागात त्यांना स्थलांतरित करणे या गोष्टींचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये