“… अध्यक्षपदासाठी माझी तयारी नाही पण, पक्षांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार” : शरद पवार
!["... अध्यक्षपदासाठी माझी तयारी नाही पण, पक्षांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार" : शरद पवार sharad pawar press](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/04/sharad-pawar-press-711x470.jpg)
नवी दिल्ली : शरद पवार यांनी बुधवारी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राजकारणात चर्चेला मोठं उधाण आलंय. या भेटीत केंद्रीय सरकारी यंत्रणांकडून महाराष्ट्रात होणाऱ्या कारवायांसदर्भात चर्चा होईल अशी सर्वांना अपेक्षा होती मात्र त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं मोदींच्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. प्रफुल्ल के. पटेल यांची लक्षद्वीपच्या प्रशासकपदी निवड झाल्यानंतर तिथं सुरू असलेल्या घडामोडींबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच संयुक्त पुरोगामी आघाडीबाबत देखील त्यांनी पत्रकार परिषदेत मोठा खुलास केला आहे.
शरद पवार यांची संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या काही नेत्यांनी केली. याबाबत बोलताना पवार म्हणाले की, ‘यूपीएचं अध्यक्षपद आम्हाला देण्यात यावं, अशी माझी किंवा आमच्या पक्षाची भूमिका नाही. ही जबाबदारी घेण्याची माझी तयारी नाही. मात्र भाजपेतर पक्षांना एकत्र आणण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील, ते मी करणार आहे.’
‘पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माझी भेट घेऊन देशातील भाजपेतर पक्षांना एकत्र आणत बैठक घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार मी आता भाजपच्या विरोधात असणाऱ्या देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांसोबत संपर्क साधण्यास सुरुवात करत आहे,’ अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पुन्हा एकदा देशपातळीवरील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
!["... अध्यक्षपदासाठी माझी तयारी नाही पण, पक्षांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार" : शरद पवार sharad pawar mamata](https://rashtrasanchar.vocalforlocal.biz/wp-content/uploads/2022/04/sharad-pawar-mamata.jpg)
महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. महाविकास आघाडीने शिफारस केल्यानंतरही राज्यपालांनी १२ आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं नाही, हा विषय मी पंतप्रधानांसमोर मांडला असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. तसंच राज्यसभा खासदार आणि दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या अन्यायकारक कारवाईचा विषयही मी नरेंद्र मोदी यांच्या कानावर घातल्याचं शरद पवार म्हणाले.