“मरेपर्यंत ठाकरे कुटुंबासोबत काम करणार”; निष्ठावंत आमदाराचं वक्तव्य!
रत्नागिरी : (Rajan Salavi On Uddhav Thackeray) कोकणातील शिवसेना आमदार राजन साळवी हे बंडखोर शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्या कालपासून येत होत्या. यावर आता खुद्द साळवी यांनी स्पष्टीकरण दिलं असून ते म्हणाले, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पायाशी माझी निष्ठा आहे. मी त्यांच्याशीच प्रामाणिक आहे आणि अखेरपर्यंत शिवसेनेतच राहणार, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
दरम्यान, राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये होत्या. मात्र मी अशा प्रकारे कोणतीही भेट घेतली नसून माझ्या बाबतीत अशा अफवा पसरवल्याबद्दल दुःख वाटत असल्याची प्रतिक्रिया साळवी यांनी दिली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, मी गेले ४० वर्ष शिवसैनिक म्हणून काम करतोय. शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, तीन वेळेचा आमदार आणि उपनेता म्हणून महाराष्ट्रात काम करतोय.
आपण मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, मी आदित्य ठाकरेंसोबत अनेक जिल्ह्यात ‘शिवसंवाद’ दौऱ्यावर होतो. अलिबाग, महाडच्या विधानसभा मतदार संघात गेलो. तेथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपनेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना बांधणीसाठी काम करणं ही माझी जबाबदारी आहे. भविष्यातही शिवसेनेचा उपनेता म्हणून मी राज्यभर दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे माध्यमांत फिरणाऱ्या आफवांवर आता ब्रेक लागणार आहे.