संजय बियाणी हत्या प्रकरण: पालकमंत्री अशोक चव्हाणांची बियाणी कुटुंबियांना भेट
![संजय बियाणी हत्या प्रकरण: पालकमंत्री अशोक चव्हाणांची बियाणी कुटुंबियांना भेट sanjay biyani nanded](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/04/sanjay-biyani-nanded.jpg)
नांदेड: मंगळवार 5 एप्रिल 2022 रोजी सकाळी अकरा वाजता सुप्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी नांदेड शहरातील शारदानगर येथील घराबाहेर निघताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबारात बियाणी आणि त्यांचा कार चालक गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचार सुरु असतानाच संजय बियाणी यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली आहे.
![संजय बियाणी हत्या प्रकरण: पालकमंत्री अशोक चव्हाणांची बियाणी कुटुंबियांना भेट sanjay biyani 02](https://rashtrasanchar.vocalforlocal.biz/wp-content/uploads/2022/04/sanjay-biyani-02.jpg)
संजय बियाणी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर नांदेडचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी बियाणी कुटुंबाची भेट घेतली. नांदेड विभागाचे आयजी, एसपी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन मंत्री चव्हाण यांनी बियाणी कुटुंबीयांशी चर्चा केली. या भेटीत बिल्डर संजय बियाणींच्या हत्येमागचे काही धागेदोरे मिळतात का, याची चाचपणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बियाणी यांच्या हत्येने पालकमंत्री स्वतः प्रचंड अस्वस्थ झाले असून या हत्येचा तातडीने तपास लावण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या असल्याची माहिती आहे.