सुप्रिया सुळेंचा भाजपवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “मराठी माणसाच्या विरोधात कट कारस्थान…”

पुणे | Supriya Sule – राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केला आहे. मराठी माणसाच्या विरोधात कट कारस्थान करण्याचं काम भाजप करत आहे, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे. तसंच शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचीच आहे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. त्या पुण्यात (Pune) माध्यमांशी बोलत होत्या.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मराठी पक्षांच्या आणि मराठी माणसाच्या विरोधात कट कारस्थान करण्याचं काम भाजप करत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे मी आणि दादा बिलकुल नाही. त्यामुळे ही आमची वैयक्तिक लढाई नाही. राष्ट्रवादी पक्ष असंख्य कार्यकर्त्यांनी उभा केला आहे. तसंच माझं दादावरचं प्रेम आयुष्यभर कमी होणार नाही. पण आता ही लढाई वैयक्तिक नसून पक्षाची आणि विचारधारेची लढाई आहे.
देशात आणि महाराष्ट्रात पाऊस खूप कमी प्रमाणात झाला आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात चांगला पाऊस पडू दे, असं साकडं मी देवाला घातलं आहे. तसंच देशात महागाई बेरोजगारी अत्याचार वाढत चाललेत ते कमी होऊ दे. संसदेत भाजपच्या खासदारांनी जी भाषा वापरून शिवीगाळ केली ते दुर्दैवी आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारला सुबुद्धी लाभू दे, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या शहरातील अनेक गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. त्या शहरातील मानाच्या गणपती मंडळांसह एकूण 28 गणेश मंडळांना भेट देणार आहेत.