८०% पुणेकर मानसिक समस्यांच्या विळख्यात

पुणे : सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात शारीरिकच नव्हे, तर मानसिक ताण सुद्धा मोठ्या प्रमाणावर सोसावे लागत असते. पुणे शहरात साधारणतः दर पाचपैकी चार जणांना मानसिक आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. आकडेवारीनुसार तब्बल 80 टक्के पुणेकर विविध प्रकारच्या मानसिक समस्यांच्या विळख्यात असल्याचे स्प्ष्ट झाले आहे. एम-पॉवर या मानसिक आरोग्य सेवा पुरवठादार कंपनीने केलेल्या नुकत्याच एका सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
एम-पॉवरच्या माध्यमातून मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल देशात जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गरजू व्यक्तींना मदत मागण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत आहे. मेंटल हेल्थ स्कोअर जाहीर करून मानसिक आरोग्य आता लपवण्याचा विषय राहिलेला नाही, हे आम्ही संस्थेमार्फत सांगतो
-डॉ. नीरजा बिर्ला,
संस्थापक अध्यक्षा, एम-पॉवर

एम-पॉवर आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधल्या नागरिकांचे मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक ऑनलाइन सर्वेक्षण घेण्यात आले आहे. त्याचा मेंटल हेल्थ स्कोअर अर्थात मानसिक आरोग्य गुण नुकतेच सादर करण्यात आले. त्यानुसार, पुणे-पिंपरी-चिंचवडमधल्या पाचपैकी चार म्हणजेच सुमारे ८० टक्के नागरिकांना कोणती ना कोणती मानसिक आरोग्य समस्या जाणवत आहेत.