विश्लेषण

काश्मिरी युवकांचा ब्लॉगिंगकडे कल

पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न


नवी दिल्ली : काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचं नंदनवन. निसर्गसौंदर्याची खाण. म्हणूनच काश्मीरमध्ये नेहमीच पर्यटकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या यशामुळे काश्मीर खोरं, तिथला दहशतवाद, काश्मिरी पंडितांवर झालेले हल्ले हे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले. मात्र काश्मिरी युवकांना हा रक्तरंजित इतिहास मागे सोडून विकासाच्या दिशेने पावलं टाकायची आहेत. काश्मीरमधले अनेक युवक सोशल मीडियाकडे वळले असून, या माध्यमातून काश्मीरचं सौंदर्य जागतिक पटलावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

काश्मीर दहशतवादासाठी नाही तर निसर्गसौंदर्यासाठी ओळखलं जावं, असं तिथल्या युवकांना आता वाटू लागले आहे. त्यामुळेच अनेक काश्मिरी युवक ब्लॉगच्या माध्यमातून काश्मीरची नव्याने ओळख करून देत आहेत. इमाद उर रहमान, इद्रिस मीरप्रमाणे असंख्य युवक पर्यटकांना काश्मीरला येण्याचं आमंत्रण देत आहेत. त्या माध्यमातून तेथील पर्यटन फुलेल आणि युवकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच काश्मीरचे अर्थचक्र व्यवस्थित सुरू राहिले तर शांतता आणि सुबत्ता स्थापित होण्यास मोठी मदतमिळणार आहे.

२० वर्षांची फैजुल मंजूर काश्मीरची पहिली महिला यू ट्यूब ब्लॉगर असून, श्रीनगरच्या बरजुल्ला भागात राहते. फैजुलने दल सरोवरावर ब्लॉग तयार केला असून, तो खूप गाजत आहे.

इमाद उर रहमानने २०१८ मध्ये काश्मीर खोर्‍यात परतल्यानंतर इथल्या पर्यटन स्थळांचे व्हिडीओ तयार करायला सुरुवात केली. इमाद ड्रोनद्वारे चित्रीकरण करून व्हिडीओ तयार करतो आणि यू ट्यूबवरशेअर करतो. इदरीस मीर हासुद्धा इथला लोकप्रिय ब्लॉगर आहे. इदरीसचे फेसबुकवर चार लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर त्याच्या यू ट्यूब वाहिनीच्या सदस्यांची संख्या एक लाखांहून अधिक आहे. बारामुल्लाचा रहिवासी इदरीस जयपूरहून पीएचडी करीत आहे.

राशिद सर्फराज बारामुल्ला जिल्ह्यातली पर्यटनस्थळं जागतिक पटलावर नेण्याच्या प्रयत्नात आहे. राशिदने मे २०१९ पासून ब्लॉगिंग सुरू केलं. त्याच्या यू ट्यूब चॅनलचे तीस हजार सबस्क्रायबर्स आहेत. रुमान हमदानी हा सुद्धा असाच एक ब्लॉगर आहे. रूमान इन्स्टाग्रामवर काश्मीरचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो. श्रीनगरचे युनिस खान, हिलाल खान आणि मीर दानिश हे तीन मित्र ‘एक्सप्लोअर काश्मीर’ नावाचं यू ट्यूब चॅनल चालवतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये