देश - विदेश

श्रीलंकेला ७६ हजार टन इंधन पुरविले

भारताने मदत पाठविण्याची दुसरी वेळ

नवी दिल्ली : मोठ्या आर्थिक संकटाशी सामना करत असलेल्या श्रीलंकेला भारत सातत्याने मदत करीत आहे. भारताने क्रेडिटलाईन अंतर्गत दुसर्‍यांदा श्रीलंकेला इंधनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा केला आहे. मंगळवारी आणि बुधवारी भारताने ३६ हजार टन पेट्रोल आणि ४० हजार टन डिझेल श्रीलंकेला पोहोच केले आहे. यापूर्वी भारताने २.७० लाख टन इंधनाचा साठा श्रीलंकेला दिला होता.

श्रीलंकेची ढासळत असलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी भारत मोठी मदत करत असून, भारताने १ बिलीयन अमेरिकी डॉलर कर्ज देण्याची घोषणा केली आहे. यादरम्यान गोटाबाया सरकारला जनतेच्या विरोधाला सामोरे जावे लागू शकते. बुधवारी श्रीलंकेतील विद्यापीठातील प्राध्यापकांनी सरकारविरोधात निदर्शने केली.

आर्थिक संकटाच्या काळात राजपक्षे सरकारविरोधात लोकांचा रोषही वाढत आहे. हजारो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. सरकारने सर्व काही चीनला विकले असल्याने सरकारकडे पैसे नाहीत, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. बुधवारी लोकांनी सांगितले की, राजपक्षे कुटुंबाने देशाची नासधूस करणे थांबवले पाहिजे. विरोधी पक्षही सरकारच्याविरोधात मैदानात उतरले आहेत.

श्रीलंकेत अत्यावश्यक औषधांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारताने श्रीलंकेला आवश्यक औषधे पाठवली आहेत. नॅशनल आय हॉस्पिटल कोलंबोच्या संचालक डॉ. दमिका यांनी सांगितले की, आमची बहुतेक औषधे भारतातून LOC (लाइन ऑफ क्रेडिट) अंतर्गत येत आहेत, ही आमच्यासाठी मोठी मदत आहे.

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून श्रीलंकेची अर्थव्यवस्था सातत्याने घसरत आहे. त्यामुळे २ कोटींहून अधिक लोकांना अन्न आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. १९४८ नंतरचे हे देशातील सर्वात मोठे आर्थिक संकट असल्याचे मानले जात आहे. ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे श्रीलंकन रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत झपाट्याने घसरले आहे आणि त्यावरील विदेशी कर्ज सातत्याने वाढत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये