‘…राज्ये नफा कमावण्यात व्यस्त होती’- देवेंद्र फडणवीस
!['...राज्ये नफा कमावण्यात व्यस्त होती'- देवेंद्र फडणवीस devendra](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/04/devendra.jpg)
मुंबई : आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत नरेंद्र मोदींनी इंधन दरांवरुन महाराष्ट्रासह काही राज्यांना सुनावलं आहे. मोदींनी इंधनवारील व्हॅट कमी न करण्याच्या राज्यांची थेट नावं घेतली आणि खडे बोल सुनावले आहेत. यावेळी देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना व्हॅट कमी केला पाहिजे असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. यासंदर्भात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी मोदींच्या आवाहनाचा उलेख करत ठाकरे सरकारकडे इंधनावरील कर कमी करण्याची विनंती केली आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत ट्विटरवरुन महाराष्ट्र सरकारला टोला लगावला आहे. “एकमेकांना दोष देणं हे सोपं असतं आणि वाईट कामं लपवण्यासाठी फायद्याचं असतं मात्र त्यामधून सर्वसामान्यांना फायदा होत नाही. जेव्हा भारत सरकारने मागील नोव्हेंबरमध्ये इंधनावरील एक्साइज ड्युटी कमी केली आणि त्यांनी राज्यांनाही कर कपात करण्यास सांगितलं होतं. मात्र महाराष्ट्रासहीत भाजपाची सत्ता नसणाऱ्या राज्ये नफा कमवण्यात व्यस्त होती,” असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.
“पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांना इंधनावरील कर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्राने तीन हजार ४०० कोटींहून अधिक नफा मिळवला आहे. तर मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे की त्यांनी यासंदर्भात तताडीने निर्णय घेऊन मराठी माणसासहीत महाराष्ट्रातील सर्व जनतेला दिलासा द्यावा,” असंही फडणवीस म्हणाले.