लव्हीवमध्ये पोहोचली हॉलिवूडस्टार अँजेलिना जोली

रशिया-युक्रेन युद्ध अजूनही धगधगते
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध अजूनही धगधगत असून कोणताही देश माघार घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसत आहे. रशियाकडून सतत होत असलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील अनेक शहरे बेचिराख होण्याच्या मार्गावर असून हळूहळू देशातील दाहक स्थिती समोर येऊ लागली आहे. यातच चित्रपटांच्या सोनेरी पडद्यावर धाडसी स्त्रीची भूमिका साकारणारी हॉलिवूडस्टार अँजेलिना जोली हिने खर्या आयुष्यातही शौर्य दाखवले आहे. अँजेलिना जोली युक्रेनमध्ये पोहोचली असून तिने युद्धपीडितांची भेट घेतली. अँजेलिना जोली युक्रेनच्या लव्हीव शहरात युनायटेड नेशनची सदिच्छादूत म्हणून आली आहे. समोर आलेल्या अनेक व्हिडीओंमध्ये ती युद्धग्रस्तांना भेटून त्यांचे धैर्य वाढवताना पाहायला मिळाली.
अँजेलिना जोली पीडितांची भेट घेत असताना रशियन सैन्याने हल्ला केल्याने शेल्टरचा आश्रय घेतला. युक्रेनियन न्यूज साइट्सवर या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये अँजेलिना जोलीदेखील लव्हीव शहरात बॉम्बस्फोटाचा सायरन वाजल्यानंतर बॉम्ब शेल्टरच्या दिशेने आश्रय घेण्यासाठी धावताना दिसत आहे. अँजेलिनाने यूएनएचसीआर म्हणजेच संयुक्तराष्ट्र उच्चायुक्त शरणार्थीची विशेष दूत म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. इथेही ती एक विशेष दूत म्हणून पोहोचली आहे. ती लव्हीव शहरातील एका बोर्डिंग स्कूलमध्येही गेली. जिथे तिने मुलांशी संवाद साधला आणि सेल्फी घेतले. तसेच युद्धात बेघर झालेल्या लोकांची आणि कर्माटोर्स्क स्टेशनवरील हल्ल्यात जखमी झालेल्यांचीही तिने भेट घेतली आहे.