देशवासीयांना लवकरच मिळणार उष्णतेपासून दिलासा

उष्णतेची लाट म्हणजे काय?
जेव्हा तापमान अनेक दिवस सामान्य तापमानापेक्षा जास्त राहते आणि आर्द्रतादेखील वाढते तेव्हा त्याला उष्णतेची लाट म्हणतात. मैदानी भागात जेव्हा तापमान ४० अंशांच्यावर जाते तेव्हा हवामान विभाग उष्णतेची लाट जाहीर करत असते. यंदा उष्णता वाढण्याचे कारण मार्चअखेर तयार झालेले अँटिसायक्लोन असण्याची शक्यता असते. वाळवंटी भागातून उष्ण वारे येऊ लागले आहेत.
नवी दिल्ली : भारतात सध्या प्रचंड उष्णता आहे. उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात एप्रिलमध्ये १२२ वर्षांचा विक्रम मोडला गेला. येथील सरासरी कमाल तापमान ३५.९ अंश सेल्सिअस आणि ३७.७८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अशात उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या देशभरात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात हैराण झाले असून, काही ठिकाणी उष्णतेमुळे लोक आजारीदेखील पडत आहेत.पण हवामान विभागाने दिलेल्या अंदाजामुळे कोणत्या राज्यांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
एप्रिल २०१० मध्ये वायव्य भारतात सरासरी तापमान ३५.४ डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले. त्यापूर्वी १९७३ मध्ये ३७.७५ अंशांची नोंद झाली होती. शास्त्रज्ञांनी हवामानबदलाबाबत इशारा दिला आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताला सोमवारपासून उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो. दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाना, चंदीगड, पूर्व राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात ढगाळ वातावरण असेल. येथील नागरिकांना उष्णतेची लाट आणि कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. तसेच तीन मेपासून मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि पश्चिम राजस्थानमध्ये कमी उष्मा राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.