देश - विदेशस्मार्ट उद्योजक

कलेला जोपासत स्वत:ची ओळख निर्माण करणार्‍या

धनकवडी येथे राहणार्‍या रोहिणी पाटील यांनी घरगुती आकाशकंदील बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. यांचे शिक्षण दहावी झाल्यानंतर लग्न झाले. लग्नानंतर १९९६ ला त्या आपल्या पतीसोबत पुण्यात राहायला आल्या. त्यांचे पती एमपीएलमध्ये कामाला होते. पुण्यासारख्या शहरात महागाई आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त नवर्‍याच्या पगारावर करणे शक्य नव्हते त्यामुळे स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करावा, असे त्यांना वाटत होते, म्हणून त्यांनी घरगुती आकाशकंदील बनवण्याचा व्यवसाय घरातून सुरू केला. रोहिणी पाटील सांगतात की, हा व्यवसाय सुरू करताना सुरुवातीला अनेक अडचणी आल्या; परंतु शिकण्याची इच्छा होती. त्यावेळी आमच्या घराच्या बाजूला एक भाभी घरगुती आकाशकंदील बनवण्याचा व्यवसाय करीत होत्या, त्यांच्याकडे शिकायला जायचे आणि हळूहळू आकाशकंदील कसे बनवतात, हे शिकून घेतले.

एका महिन्याच्या प्रशिक्षणानंतर थोड्या प्रमाणात आकाशकंदील बनवता येऊ लागले. दुसर्‍या वर्षी एका दुकानातील लावलेला आकाशकंदील काढून आणला. तो पूर्ण खोलला आणि त्याची मापे घेतली आणि तशाच प्रकारे आपल्याला आकाशकंदील बनवता येतो का, हे बघत आम्ही आकाशकंदीलवरून आकाशकंदील बनवायला सुरुवात केली.तसेच रोहिणी आणि त्यांच्या मैत्रिणींनी एक ते दोन वर्षे एकत्र आकाशकंदील बनवण्याचे काम केले. नंतर ४-५ वर्षांनंतर स्वतंत्र स्वतःच्या घरीच काही स्त्रियांना सोबत घेऊन काम सुरू केले. त्यांच्याकडे शिकायला येणार्‍या स्त्रियांना आकाशकंदील बनवण्यासाठी कच्चा माल पुरवला जातो आणि त्यांच्याकडून कंदील बनवून घेऊन मार्केटमध्ये विकले जातात.

सर्व माल मार्केटमध्ये विकणे, कच्चा माल घरात आणून देणे हे सर्व काम त्यांचा मुलगा आणि त्यांचे पती पाहतात. हे सर्व आकाशकंदील कोणतीही मशिनरी न वापरता हाताने बनवले जातात, तर कमीत कमी १५ ते २० नग त्या बनवत असतात आणि तो बाजारपेठांमध्ये विकला जातो. सध्या त्यांच्याकडे अनेक महिला काम करीत असून घरगुती आकाशकंदील या व्यवसायातून चांगले आर्थिक उत्पन्न घेत आहेत. रोहिणी पाटील आपल्या अनुभवातून घरगुती व्यवसाय सुरू करणार्‍यांना सांगू इच्छितात की, कोणतीही कला अवगत करायची असेल तर आपल्याला त्या कलेबद्दल ओढ असली पाहिजे. आकाशकंदील बनवले ही एक कला होती. आपण त्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत. सातत्य, चिकाटी असेल तर आपण घरातून सुरू केलेला कोणताही व्यवसाय मार्केटमध्ये नावारूपाला आणू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये