‘यशश्री’ : इंजिनिअर प्रशांत कडुसकर

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील साकोरे येथील जलसंपदा विभागात कार्यरत असलेले आणि जलरत्न म्हणून उपाधी मिळालेले इंजिनिअर प्रशांत कडुसकर यांचा आज ५० वा वाढदिवस. आज प्रशांत कडुसकर पन्नास वर्षांचे होत आहेत. यापुढील आपल्या जीवनाचा कार्यकाल ते ४० टक्के शासकीय कामाला ३० टक्के वेळ कुटुंबाला आणि २० टक्के वेळ मित्रमंडळी आणि समाजाभिमुख कामाला देतील, अशी अपेक्षा आहे. जलसंपदा विभागातील एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, स्वच्छ प्रतिमेचा प्रतिभासंपन्न अधिकारी म्हणून कडुसकर यांचे नाव आदराने घेतले जाते. वयाच्या ५० वर्षांत कडुसकर यांनी मोठे यश प्राप्त केले असून त्यांच्या एकूणच शासकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा…
प्रशांत कडुसकर यांचे मूळ गाव आंबेगाव तालुक्यातील मंचरपासून पाच किलोमीटर अंतरावरील साकोरे असून त्यांचा जन्म १९७२ चा! वडील पांडुरंग कडुसकर हेदेखील जलसंपदा विभागात कार्यरत होते. वडिलांची प्रेरणा घेऊन प्रशांत यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण खेड (राजगुरुनगर) येथे घेतल्यानंतर त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी ही पदवी १९९३ मध्ये पूर्ण केली. तद्नंतर एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून सन २००० मध्ये महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात सहायक अभियंता श्रेणी-१ या पदावर त्यांची निवड झाली.
सन २००१ ते २०१० या कार्यकाळात सातारा येथे सहायक अभियंता श्रेणी-१ या पदावर कार्यरत असताना त्यांनी लघुपाटबंधारे प्रकल्पांची कामे त्याचबरोबर भामा आसखेड प्रकल्प, उरमोडी प्रकल्प येथे यशस्वीरीत्या काम करून आपल्या शासकीय कारकिर्दीचा वेगळा ठसा उमटविला. २०१० मध्ये पदोन्नतीने उरमोडी धरण विभाग सातारा या विभागात कार्यकारी अभियंतापदी इंजि. प्रशांत कडुसकर रुजू झाले. अर्थात त्यांच्या यशस्वी कामगिरीची पावती म्हणून शासनाने त्यांना महाराष्ट्र शासन उत्कृष्ट अभियंता पुरस्कार २०१० देऊन गौरवदेखील केला.
उरमोडी धरण विभागात कार्यकारी अभियंतापदावर रुजू झाल्यानंतर सन २०१० ते २०१४ या कालावधीत केलेली अनेक महत्त्वपूर्ण कामेही लक्षात राहणारी ठरतील. त्यामध्ये प्रामुख्याने उरमोडी धरणाचे बांधकाम पूर्ण करून प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रातील बाधित गावांचे स्थलांतर पूर्ण करून धरणामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केला. उरमोडी प्रकल्पाच्या सुमारे १३२४.१४ कोटी किमतीच्या प्रकल्प अहवाल शासनाची सु. प्र. मा. मिळविली. तसेच प्रकल्पाच्या सन २००९/१० च्या दरसूचीवर आधारित रुपये १४१७.७५ कोटी किमतीचा प्रकल्प अहवाल राज्य वित्त विभागाची सहमतीदेखील मिळवली. केंद्रीय जलआयोगाची तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळविण्यात इंजि. प्रशांत कडुसकर यशस्वी ठरले.
दरम्यान, सन २०१२ च्या दुष्काळी परिस्थितीत टंचाईग्रस्त खटाव तालुक्यामध्ये उरमोडी प्रकल्पाचे पाणी पोहोचविण्यासाठी प्रकल्पांतर्गत कन्हेर जोड कालव्यावरील भूसंपादनाचे प्रश्न सोडून जोडकालव्याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करून प्रकल्पाचे पाणीटंचाईग्रस्त येरळवाडी प्रकल्पात सोडले. धरणातून पाणी सोडण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते झाला. येरळवाडी मध्यम प्रकल्पात पोहोचलेल्या या पाण्यामुळे खटाव आणि माण तालुक्यातील जनतेला आणि पशुधनाला पाण्याचा स्रोत निर्माण झाला. याकरिता जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडूनदेखील प्रशांत कडुसकर यांचा गौरव झाला.
भूसंपादनातील अडथळे कोर्ट केसेसचे प्रश्न सोडवून खटाव आणि माण कालवा पूर्ण करण्यात कडुसकर यशस्वी झाले. सामाजिक बांधिलकीमधून सातारा शहरानजीक असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील दहा तळ्यांचा विकास आराखडा कडुसकर यांनी तयार केला आणि राज्याच्या पर्यटन विभागाची प्रशासकीय मंजुरीदेखील प्राप्त केली. त्यासाठी त्यांनी तीन कोटी रुपये मंजूर करून आणले, तसेच पर्यटन विभागाकडून प्राप्त निधीमधून २५ लाख रुपये मंजूर केले. सातारा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तळ्यांच्या पुनरुज्जीवनाची कामे पूर्ण करून तळ्यामध्ये एक कोटी लिटर पाणीसाठा करण्यामध्ये कडुसकर यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे.
दरम्यानच्या कालखंडात इंजि. कडुसकर यांची सांगली येथे टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्रमांक – १ येथे कार्यकारी अभियंता म्हणून बदली झाली. तत्कालीन अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले यांच्या मार्गदर्शनाखाली इंजि. प्रशांत कडुसकर यांनी टेंभू प्रकल्पातील अनेक महत्त्वपूर्ण कामात योगदान दिले. येथे कार्यरत असताना कवठेमहांकाळ कालवा किलोमीटर एक ते वीसमधील मातीकाम, बोगदे, जलसेतू आदी कामे पूर्ण करून टेंभू प्रकल्पाचे पाणीटंचाईग्रस्त कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी, लंगरपेठ तलावात प्रथमच सोडले. या कामाचा जलपूजन समारंभ जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाला. टेंभू प्रकल्पाचे पाणी प्रथमच कवठेमहांकाळ तालुक्यात पोहोचविण्यात इंजि. प्रशांत कडुसकर यांचे योगदान तितकेच मोलाचे योगदान राहिले आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव कालवा किमी ८ ते २६ मधील मातीकाम, बोगदे जलसेतू पूर्ण करून हा प्रकल्प त्यांनी पूर्ण केला. टेंभू प्रकल्पाचे पाणी प्रथमच भाग्यनगर तलावात सोडले गेले. पंपगृह टप्पा क्रमांक चार पेजेगाव कार्यान्वित केला गेला. टेंभू प्रकल्पातील कचरेवाडी कालवा गोरेवाडी डावा आणि उजवा कालवा तसेच कवठेमहांकाळ कालवा किमी २० ते ४० बंदिस्त नलिका पद्धतीने करण्याच्या कामामध्ये संकल्पनामधून अंशतः पूर्णत्वापर्यंत कडुसकर यांचा सहभाग राहिला. खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील ३६ हजार हेक्टर क्षेत्रावरील बंदिस्त नलिका वितरण व्यवस्थेचे सर्वेक्षणासह अंशतः कार्यान्विकरणामध्येदेखील त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
सन २०१९ मध्ये प्रशांत कडुसकर यांनी कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक – १ नारायणगावचा कार्यकारी अभियंता म्हणून पदभार स्वीकारला. या विभागात पाच मोठी धरणे, ८४ लघुप्रकल्पाचे सिंचन व्यवस्थापन आहे. अवघ्या दोन-अडीच वर्षांच्या कालावधीत अपुरा अधिकारी आणि कर्मचारीवर्ग असूनही सिंचन व्यवस्थापन आणि नियोजनाच्या कामात त्यांनी वेगळा ठसा उमटवला आहे. आजतागायत कडूसकर या पदावर अद्यापही कार्यरत आहेत. येथे काम करीत असताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचदेखील त्यांना वेळोेवेळी मार्गदर्शन मिळत गेले. इंजि.
प्रशांत कडुसकर या व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास जीवनाच्या सर्व आघाड्यांवर यशस्वी होण्यासाठी झगडणार्यांना आदर्शवत असाच आहे. शासनाच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करीत असताना कामाविषयी निष्ठा बाळगून दिलेल्या जबाबदारीला पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याची त्यांची असलेली सचोटी वाखाणण्याजोगी आहे आणि म्हणूनच प्रशांत कडुसकर हे व्यक्तिमत्त्व जलसंपदा विभागाची बौद्धिक संपदा म्हणून कार्यरत असल्याची खात्री पटते. त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनंत शुभेच्छा!